* संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त समाज कल्याण विभागाचा विशेष उपक्रम ; जनसहभागातून स्वच्छतेचा जागर
रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशात स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाचा भक्कम पाया रचला आहे. आज भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असतांना देश महासत्तेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहे. याच गौरवशाली प्रवासाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यभरात 'सामाजिक समता सप्ताह' साजरा केला जात आहे.
या सप्ताहानिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथील गोविंद बंदर परिसरात विशेष 'दलितवस्ती स्वच्छता अभियान' अत्यंत उत्साहात राबविण्यात आले. हे स्वच्छता अभियान सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून यामध्ये शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले. या मोहिमेत समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, समतादूत, अलिबाग नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी अतिशय सक्रिय सहभाग नोंदविला. सर्वांनी एकत्र येत परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून वस्तीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर केला. केवळ स्वच्छताच नव्हे, तर या माध्यमातून सामाजिक एकतेचा आणि स्वच्छ आरोग्याचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करतांना सामाजिक समता सप्ताहाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्यासाठी सामाजिक समता आणि स्वच्छता या दोन गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत, यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. संविधानाने दिलेल्या मूल्यांची जोपासना करत असतानाच आपल्या परिसराचे आरोग्य राखणे, ही देखील एक प्रकारे राष्ट्रसेवाच असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या अभियानामुळे गोविंद बंदर परिसरातील नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून समाज कल्याण विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments