* स्मार्ट पॉईंट - डॉमिनोज परिसरात कुत्र्यांची टोळकी
* कचरा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे समस्या तीव्र
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही समस्या गंभीर बनत चालली असून अनेक भागांमध्ये कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरतांना दिसत आहेत. परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेषतः स्मार्ट पॉईंट आणि डॉमिनोज परिसरात 10 ते 15 भटक्या कुत्र्यांची टोळकी वारंवार दिसून येत आहे. या भागात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांकडून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने उघड्यावर टाकलेला अन्नकचरा कुत्र्यांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे या परिसरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत असून त्या चिंतेचा विषय ठरत आहेत. पादचाऱ्यांवर हल्ले व दुचाकी वाहनांच्या पाठलागाच्या घटना, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका, रात्रीच्या वेळी सार्वजनिक शांततेचा भंग, रेबीज (Rabies) सारख्या जीवघेण्या आजारांचा संभाव्य धोका उद्भवत आहेत. या परिसरात हनुमान मंदिर आणि गाजी बाबांची दर्गा असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मात्र, अन्न कचऱ्यामुळे येथे कुत्र्यांची गर्दी वाढली असून ते अचानक रस्त्यावर धावत येत असल्याने दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी खोपोली नगर परिषद प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. वेळेत उपाययोजना न केल्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी तातडीने मोहिम राबवावी, कचरा व्यवस्थापन प्रणाली सुधारावी, अन्न कचरा उघड्यावर टाकणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करावी, निष्काळजी अधिकाऱ्यांवर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी अशा उपाययोजनांची जोरदार मागणी करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments