* विचारांचा जागर, परिवर्तनाची मशाल : डॉं. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त समतेचा संदेश
खोपोली / दिनकर भुजबळ :- खोपोली नगर परिषदेच्या वतीने डॉं. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि सम्राट अशोक यांच्या संयुक्त जयंती महोत्सव 2026 उत्साह, अभिमान आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समता, ज्ञान आणि न्यायाच्या मूल्यांचा जागर करणारा हा सोहळा खोपोली शहरात परिवर्तनाची नवी प्रेरणा देणारा ठरला.
शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता नगर परिषद कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे यांच्या हस्ते झाले, तर उपाध्यक्ष विक्रम यशवंत साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही खोपोलीकर आणि महात्मा फुले समन्वय समिती यांच्या वतीने आयोजित रथयात्रा व भव्य बाईक रॅलीने शहरात समतेचा संदेश पोहोचविला. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. बाजारपेठ मार्गे संपूर्ण शहरातून फिरत ही रॅली डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली, जिथे अभिवादन करून समारोप करण्यात आला. या रॅलीत माजी नगराध्यक्ष डॉं. सुनिल पाटील, पोलीस निरीक्षक सचिन हिरे, अनिल सानप, सुवर्णा मोरे, वर्षा मोरे, ज्योती भुजबळ, महेश काजळे, मोहन केदार, राकेश मिरवणकर, अमोल गायकवाड आदी मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सायंकाळी 7 वाजता डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ “संविधानाने मला काय दिले...समजून घेणे ही काळाची गरज” या विषयावर प्रख्यात लेखक, संपादक व वक्ते संजय श्रीधर आवटे यांचे प्रभावी व्याख्यान पार पडले. या व्याख्यानातून संविधानातील मूल्यांची जाणीव, सामाजिक जबाबदारी आणि नागरिक कर्तव्यांची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.
कार्यक्रमात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि सम्राट अशोक यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. स्त्री शिक्षणाची क्रांती, जातीभेदाविरोधातील संघर्ष, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सामाजिक समतेचा संदेश या सर्व बाबींनी समाजाला दिलेली दिशा अधोरेखित करण्यात आली.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, अनिल सानप, सुवर्णा मोरे, अमित फाळे, संदीप पाटील, विनायक तेलवणे, माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, सुमती कोळंबे, उल्हाराव देशमुख, यशवंत गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments