* महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य रथयात्रा व बाईक रॅली
* “आम्ही खोपोलीकर” संघटनेच्या वतीने पाचव्या वर्षी आयोजन
* समतेचा संदेश देत शिवाजी महाराज स्मारक ते डॉं. आंबेडकर स्मारक असा उत्साहपूर्ण प्रवास
खोपोली / प्रतिनिधी :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त खोपोली शहरात “आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय” संघटनेच्या वतीने आयोजित भव्य रथयात्रा व बाईक रॅली उत्साहात पार पडली. वर्ष पाचवे असलेल्या या उपक्रमाला खोपोलीकरांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
* शिवस्मारकात अभिवादनाने रॅलीला सुरुवात :- रॅलीची सुरुवात शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक सचिन हिरे, माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील, बांधकाम सभापती अनिल सानप, नगरसेविका सुवर्णा मोरे, ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “क्रांतीसूर्य महात्मा फुले विजय असो”, “जय ज्योती, जय क्रांती” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रथयात्रेला प्रारंभ झाला.
* वेशभूषेतून साकारला इतिहासाचा जिवंत अनुभव :- प्रमोद गायकवाड आणि वर्षा मोरे यांनी अनुक्रमे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून उपस्थितांना त्या काळात नेल्याचा अनुभव दिला. या अभिनव सादरीकरणामुळे रथयात्रेला वेगळेच आकर्षण लाभले आणि कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.
* शहरातून समतेचा संदेश देत भव्य रॅली :- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिळफाटा) ते खोपोली बाजारपेठ मार्गे भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत रथयात्रा व बाईक रॅली काढण्यात आली. समारोप प्रसंगी डॉं. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून “जय भीम”, “महात्मा फुले विजय असो” अशा घोषणांमध्ये कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करीत समाजप्रबोधनाचा संदेश दिला. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी समता, बंधुता आणि मानवता हाच खरा धर्म असल्याचा संदेश दिला. वर्षा मोरे यांनी महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले, तर प्रमोद गायकवाड यांनी समाजसेवेचा मार्ग स्विकारण्याची प्रेरणा व्यक्त केली.
* बालिकेची उल्लेखनीय सादरीकरण :- 8 वर्षीय कु. रुत्वा संकपाळ हिने आपल्या बालशैलीत महात्मा फुले यांच्याविषयी माहिती सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या सादरीकरणाचे सर्वांनी कौतुक केले. महेश काजळे यांनी खोपोलीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची मागणी केली. या मागणीला उपस्थित नागरिकांनी समर्थन दिले. बांधकाम सभापती अनिल सानप यांनी ही मागणी रास्त असल्याचे सांगत ती कौन्सिलमध्ये मांडून मंजूर करण्याचे आश्वासन दिले.
खोपोली पोलिस स्टेशन व खालापूर तहसील कार्यालय यांनी कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी व सहकार्य दिले. पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी स्वतः सहभाग घेतला असून महिला व पुरुष पोलिसांनी उत्तम नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व खोपोलीकर, महात्मा फुले अनुयायी आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे समन्वय समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. विशेष सहकार्य म्हणून शाहिद शफी शेख व इरफान शफी शेख यांनी रथ उपलब्ध करून दिला.


Post a Comment
0 Comments