* हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार, 16 एप्रिलला गंधमुक्ती कार्यक्रम
* संपूर्ण गावासाठी सामूहिक भोजन ; दुपारी 2 नंतर बाजारपेठ बंद
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा गावात 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता ‘वानर देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानराचे अल्पशा आजाराने निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण गावाने एकत्र येत अत्यंत श्रद्धाभावाने हिंदू रुढी-परंपरेनुसार अंत्यसंस्कार व दशक्रिया विधी पार पाडले. आता त्यांचा गंधमुक्ती कार्यक्रम गुरुवार, 16 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
नगरदेवळा येथील राजेंद्र रंगराव महाजन यांच्या सुमनाई निवासस्थानाजवळील जनार्दन स्वामी कुटीया परिसरात वास्तव्य करणाऱ्या या वानराच्या निधनाची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी एकत्र येत त्याला श्रद्धांजली अर्पण केली. हिंदू धर्मात वानरांना भगवान हनुमानाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे ग्रामस्थांनी या घटनेकडे अत्यंत श्रद्धेने पाहिले. रात्री 8 वाजता गावातून वानर देवांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत गावातील तरुण, जेष्ठ नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ जेसीबीच्या सहाय्याने खड्डा तयार करून वानर देवांचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर हिंदू परंपरेनुसार दशक्रिया विधीही पूर्ण करण्यात आला.
वानर देवांच्या स्मरणार्थ गंधमुक्ती कार्यक्रम गुरुवार, 16 एप्रिल रोजी सकाळी आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी 7 वाजता नदीपात्रात पाच कंदीलजवळ संपूर्ण गावासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा, तसेच गावातील तरुणांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जय बजरंग श्रीराम व्यायाम शाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरदेवळा येथील संपूर्ण बाजारपेठ दुपारी 2 वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व व्यापारी बांधवांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. वानर देवांच्या निधनानंतर संपूर्ण गावाने एकत्र येत पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार व धार्मिक विधी पार पाडणे ही घटना श्रद्धा, सामाजिक एकता आणि संस्कारांचे जिवंत उदाहरण ठरत आहे. नगरदेवळ्यातील हा अनोखा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.


Post a Comment
0 Comments