* निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पाचोरा तालुक्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला नगरदेवळा परिसरात मोठा ‘बूस्टर डोस’ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युवा नेते प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये भव्य पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
* निवडणुकांबाबत अनिश्चितता ; ‘तारीख पे तारीख’चे राजकारण :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप स्पष्टता नसून ‘तारीख पे तारीख’ अशीच परिस्थिती कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दिवाळीच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. नगरदेवळा येथे ग्रामपंचायत की नगर पंचायत याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने राजकीय गोंधळ कायम आहे. 26 जानेवारी रोजी नगर पंचायतीची घोषणा होण्याची अपेक्षा होती, मात्र राज्य शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने स्थानिक राजकारण अधिकच अनिश्चिततेत सापडले आहे.
* नगर पंचायत निर्णयावर निवडणुकांचे भविष्य अवलंबून :- नगरदेवळा नगर पंचायत अस्तित्वात आल्यास पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांशी गावाचा संबंध संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यात नवीन 20 जिल्हे, 150 तालुके आणि 100 नगरपंचायती जाहीर होण्याची चर्चा असली तरी आर्थिक भारामुळे हा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने राजकीय समीकरणे सतत बदलत आहेत.
* कार्यकर्ता संवादातून नवा जोश :- या अनिश्चिततेच्या वातावरणात भारतीय जनता पार्टीने नगरदेवळा येथे जिल्हा परिषद गट कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. या मेळाव्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नगरदेवळा परिसरातील अनेक गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विविध पक्षांतील पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. अक्षय तृतीयानंतर हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
* मुन्नाभाऊ भांडारकर यांचा प्रभाव :- युवा नेते मुन्नाभाऊ भांडारकर यांनी कोणतेही पद नसतानाही ‘80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ या तत्वावर गेल्या काही महिन्यांत प्रभावी कामगिरी केली आहे. नगरदेवळा व परिसरात विविध विकासकामे मार्गी लावून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे.
* पक्षाला मिळणार नवी ऊर्जा :- या पक्षप्रवेशामागे माजी आमदार दिलीप वाघ, वैशालीताई सूर्यवंशी, अमोल शिंदे यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरत आहे. भाजपमधील एका वरिष्ठ नेत्यानेही या घडामोडींना दुजोरा देत, “कार्यकर्ता संवाद मेळाव्यामुळे पक्षाला नवी दिशा मिळाली आहे,” असे स्पष्ट केले.
एका बाजूला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील अंतर्गत संघटन मजबूत करण्यावर भर देत असतांना, दुसरीकडे भाजप आक्रमक रणनीतीने मैदानात उतरल्याचे दिसत आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पाचोरा तालुक्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरदेवळा व परिसरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. भाजपला मिळणारा हा ‘बूस्टर डोस’ आगामी राजकारणात निर्णायक ठरेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments