* शिवसेना नेते शितल सोमवंशी यांचा स्तुत्य पुढाकार
* स्वखर्चातून आयोजित सहलीत जेष्ठ नागरिकांना सुरक्षित, आरामदायी प्रवासाची सुविधा
पाचोरा / फिरोज पिंजारी :- तालुक्यातील बाळद गावातील जेष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. बाळद नगरीचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक शितल सोमवंशी यांनी आपल्या स्वखर्चातून जेष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शनाची विशेष सहल आयोजित करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
समाजातील जेष्ठ नागरिकांनी आयुष्यभर कुटुंब आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. या सहलीत गावातील अनेक जेष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत होता. सहल सुरळीत पार पडावी यासाठी बस, निवास, भोजन आणि वैद्यकीय सुविधा यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जेष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्व आवश्यक बाबींची काळजी घेतल्यामुळे त्यांनी निर्धास्तपणे सहलीचा आनंद घेतला.
या सहलीदरम्यान जेष्ठ नागरिक विविध पवित्र धार्मिक स्थळांना भेट देऊन पूजा-अर्चा करणार आहेत. धार्मिक वातावरणात वेळ घालवल्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळणार असून आयुष्यात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रसंगी माजी जि. प. सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब (जिभू) पाटील यांनी उपस्थित राहून जेष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी जेष्ठ नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे तसेच त्यांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा, अशी भावना व्यक्त केली.
या उपक्रमामुळे जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून आली. अनेकांनी ही सहल आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगितले. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून अशा सामाजिक कार्यांमुळे समाजात एकोप्याची भावना अधिक दृढ होते, असे मत व्यक्त केले.


Post a Comment
0 Comments