* निरोपावेळी भावनिक वातावरण : अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
लातूर / प्रतिनिधी :- लातूरच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबई येथे बदली झाल्याने जिल्ह्यात भावनिक वातावरण निर्माण झाले. शनिवारी (दि. 4) त्यांनी पदभार सोडतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निरोपावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या भावनिक क्षणाचे साक्षीदार असलेल्यांनाही गहिवरून आले.
जुलै 2023 मध्ये जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून इतिहास रचला. त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व स्तरांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत टीमवर्कला प्राधान्य दिले. अधिकारीपदाचा बडेजाव न मिरवता त्यांनी सर्वांना समजून घेत काम करण्याची शैली जपली. एखाद्या उपक्रमाचे यश हे सामूहिक सहभागावर अवलंबून असते, या विश्वासातून त्यांनी प्रशासनात सकारात्मक वातावरण निर्माण केले.
वर्षा ठाकूर-घुगे यांची कार्यशैली केवळ प्रशासकीय मर्यादांपुरती सीमित नव्हती, तर त्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यावर भर दिला. अनोळखी लोकांच्या भावना ओळखून त्यांना मदत करण्याची त्यांची संवेदनशीलता अनेकांनी अनुभवली. त्यामुळे त्या अधिकारी नसून कुटुंबातील सदस्य असल्यासारख्या वाटत होत्या, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
उपविभागीय अधिकारी रोहिणी विरोळे म्हणाल्या की, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकोपयोगी कामे करता आली. आमच्या कामाला राज्यस्तरावर ओळख मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाची प्रेरणा कायम राहील. तर उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी सांगितले की, वर्षा मॅडम यांनी माणुसकी जपणारे प्रशासन दाखवले. महिला अधिकारी म्हणून त्यांचा आधार आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
अडीच वर्षांच्या कार्यकाळात वर्षा ठाकूर-घुगे यांनी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून प्रशासनाला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजनांना गती मिळाली आणि जिल्ह्याला राज्यस्तरावर गौरवही प्राप्त झाला.
निरोप समारंभाच्या वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गहिवर दाटून आला. विशेष म्हणजे या प्रसंगी वर्षा ठाकूर-घुगे यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. एखाद्या अधिकाऱ्याला निरोप देतांना असा भावनिक प्रतिसाद मिळणे दुर्मिळ मानला जातो, आणि हे त्यांच्या कार्यशैलीचे व व्यक्तिमत्त्वाचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.
वर्षा ठाकूर-घुगे यांच्या कार्यामुळे लातूर जिल्ह्यात प्रशासन आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले. त्यांच्या कार्याची आठवण आणि त्यांनी दिलेली प्रेरणा प्रशासनासाठी कायम मार्गदर्शक ठरणार आहे.


Post a Comment
0 Comments