Type Here to Get Search Results !

सम्राट अशोक जयंतीनिमित्त नालासोपाऱ्यात ऐतिहासिक बौद्ध स्तूपावर अभिवादन

* महापौर अजीव पाटील यांची उपस्थिती

* शांतता, अहिंसा व बंधुभावाचा संदेश

नालासोपारा / प्रतिनिधी :- सम्राट अशोक यांच्या 2330 व्या जयंतीनिमित्त नालासोपारा येथील ऐतिहासिक बौद्ध स्तूप परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी उपस्थित राहून सम्राट अशोक यांच्या कार्याला अभिवादन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

याप्रसंगी महापौर अजीव पाटील यांनी बौद्ध स्तूपावर पुष्पहार अर्पण करीत सम्राट अशोक यांच्या विचारांना व कार्याला मानवंदना दिली. आपल्या भाषणात त्यांनी अहिंसा, शांती आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा पुनरुच्चार केला. आजच्या काळात समाजात शांतता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी सम्राट अशोक यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे, असे ते म्हणाले.


नालासोपारा येथील बौद्ध स्तूप हा प्राचीन इतिहासाचा महत्त्वपूर्ण वारसा असून सम्राट अशोकांच्या काळातील बौद्ध धर्मप्रसाराचे प्रतीक मानला जातो. महापौरांनी या स्थळाच्या संवर्धनासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी लोकनेते हितेंद्र ठाकूर व त्यांच्या टीमकडून नेहमीप्रमाणे सहकार्य राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. सामाजिक व ऐतिहासिक उपक्रमांसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.


कार्यक्रमात स्थानिक नागरिक, बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प केला.


या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व स्थानिक कलाकारांनी बौद्ध धर्मावर आधारित गीते, नृत्य व नाट्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारीचेही भान जपले.


सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून नालासोपारा परिसरात ऐतिहासिक वारशाची जाणीव अधिक दृढ झाली असून समाजात शांतता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश पोहोचला. महापौर अजीव पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उंची प्राप्त झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे सकारात्मक बदल घडवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement