Type Here to Get Search Results !

चौलमध्ये सुक्या चाऱ्याची भीषण टंचाई

* पशुपालक अडचणीत, दूध उत्पादन घटले

* अवकाळी पाऊस व हवामान बदलाचा फटका

अलिबाग / ओमकार नागावकर :- अलिबाग तालुक्यातील चौल परिसरात सध्या सुक्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे. पर्यटनासाठी ओळख असलेल्या या भागात शेती आणि पशुपालन हा अनेक कुटुंबांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असताना, चाऱ्याअभावी हा व्यवसाय डळमळीत झाला आहे.

मागील काही दिवसांपासून सतत बदलणारे वातावरण, अवकाळी पाऊस आणि अनियमित हवामानामुळे चाऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, सध्या सुक्या चाऱ्याची उपलब्धता अत्यंत कमी झाली असून पशुपालकांना जनावरांच्या चारापूरवठ्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


पुरेसा व पौष्टिक चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. चाऱ्याअभावी जनावरे अशक्त होत असून त्यांच्या उत्पादकतेत घट होत आहे. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे.


सध्या दूध उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकीकडे दुधाला मिळणारा दर स्थिर असताना, दुसरीकडे चाऱ्याचा वाढता खर्च आणि उपलब्धतेची कमतरता यामुळे पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.


या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी शासनाकडे सुक्या चाऱ्याचा तातडीने पुरवठा करावा, अनुदानित दरात चारा उपलब्ध करून द्यावा, पशुपालकांसाठी विशेष मदत योजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे. जर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात पशुपालन व्यवसाय मोठ्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या व्यवसायाला वाचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement