Type Here to Get Search Results !

मतदार यादी मॅपिंग त्वरित पूर्ण करा - महापौर अजीव पाटील

* मतदार यादी पुनरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी

* नागरिकांनी वेळेत माहिती सादर करावी, अन्यथा नाव वगळण्याची शक्यता

विरार / प्रतिनिधी :- वसई-विरार शहर आणि परिसरातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली असून, मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या बीएलओ (Booth Level Officer) मार्फत मतदारांचे मॅपिंग वेगाने सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित रहावा, यासाठी वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी नागरिकांना तातडीने मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

* 2002 च्या मतदार यादीची तपासणी अनिवार्य :- या प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक मतदाराने सर्वप्रथम आपले नाव 2002 च्या मतदार यादीत होते का, याची खात्री करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्या यादीत नसेल, तर पर्यायी म्हणून आई, वडील, आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कोणाच्याही नावाची 2002 सालची माहिती सादर करावी लागणार आहे. या माहितीत संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, राज्य व जिल्हा, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक तसेच अनुक्रमांक यांचा अचूक तपशील देणे आवश्यक आहे.


* विवाहित महिलांसाठी विशेष सूचना :- प्रशासनाने विवाहित महिलांसाठी विशेष सूचना दिल्या आहेत. मॅपिंग करतांना त्यांनी सासरच्या नोंदी न देता, स्वतःच्या आई किंवा वडिलांची 2002 सालची माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 


* मॅपिंग न केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता :- सदर मॅपिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित मतदाराचे नाव आगामी मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही दिरंगाई न करता आपल्या परिसरातील बीएलओशी त्वरित संपर्क साधून आवश्यक माहिती जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 


* लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे आवाहन :- मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा पाया असून, तो सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. महापौर अजीव पाटील यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदार यादी मॅपिंगची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान नोंदवा. ही मोहीम केवळ प्रशासकीय नसून लोकशाही टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने वसई-विरारकरांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement