* 470 लाभांचे वितरण : शासन नागरिकांच्या दारी ; विविध विभागांच्या योजनांचा लाभ, तक्रारींचे तत्काळ निराकरण
पाचोरा / फारूख शेख :- तालुक्यातील पुनगाव येथे शुक्रवार, 10 एप्रिल 2026 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात आला असून तब्बल 470 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे आणि पाचोरा नगरपालिकेचे गटनेते सुमित किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडले. शिबिराची प्रस्तावना मंडळ अधिकारी सुधाकर पाटील (लोहटार) यांनी मांडली, तर सूत्रसंचालन माजी सरपंच चिंतामण पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रजेच्या अडचणी तत्काळ सोडविण्याची परंपरा निर्माण केली होती. त्याच विचारातून शासनाने नागरिकांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे यावेळी सांगण्यात आले. या शिबिरात महसूल, ग्रामपंचायत, कृषी, सामाजिक न्याय, आरोग्य, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ आदी विविध विभागांच्या तक्रारी व अर्ज स्विकारून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या शिबिरात संजय गांधी योजना लाभ, कृषी विभागाकडून शेतीसाठी अवजारे वाटप, पुरवठा विभागाकडून ई-शिधापत्रिका वितरण, एस.टी. महामंडळाकडून NCMC कार्ड नोंदणी, वारस दाखल 7/12, सातबारा दुरुस्ती, उत्पन्न दाखले, घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे अशा विविध सेवा व लाभांचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली.
लोहटार मंडळ व परिसरातील शेकडो नागरिकांनी शिबिराला भेट देत विविध शासकीय योजनांची माहिती घेतली आणि अर्ज सादर केले. नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करीत “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी तहसीलदार विजय बनसोडे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड, सरपंच सुनिता पाटील, चेअरमन प्रल्हाद पाटील, माजी सरपंच प्रल्हाद गुजर, उपसरपंच अनिल पाटील, माजी सरपंच शिवलाल मोची यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महसूल सेवक, पोलिस पाटील, रेशन दुकानदार उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments