* ग्रामस्थ संतप्त : वारंवार तक्रारींनंतरही प्रशासन गप्प
* ॲंड. तुषार येरुणकर यांची तातडीने कारवाईची मागणी
खालापूर / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यातील नडोदे गावाजवळ विनापरवानगी सुरुंग (ब्लास्टिंग) सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
माजी सैनिक ॲंड. तुषार येरुणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठेकेदारांकडून नडोदे परिसरात पूर्णपणे विनापरवानगी सुरुंग लावून ब्लास्टिंग सुरू आहे. या बेकायदेशीर प्रकारामुळे घरांना तडे जाण्याचे प्रकार वाढले आहे, मालमत्तेचे नुकसान होत आहे, मोठ्या आवाजामुळे नागरिक त्रस्त असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण आहे. पर्यावरण आणि भूजलावर दुष्परिणाम होत असून मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे, अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
सतत सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे जमिनीची धूप, भूजल पातळीवर परिणाम आणि नैसर्गिक संतुलन बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, गावातील लहान मुले, वृद्ध नागरिक आणि जनावरे यांच्यावरही या प्रकाराचा मानसिक व शारीरिक परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
वारंवार लेखी व मौखिक तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा प्रकारे नियमांची पायमल्ली होत असतांना प्रशासन गप्प का ?असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
माजी सैनिक तुषार येरुणकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाकडे मागणी केली आहे की, बेकायदेशीर ब्लास्टिंग तात्काळ बंद करण्यात यावे, संबंधित ठेकेदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई द्यावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा मार्ग अवलंबिला जाईल. नडोदे परिसरातील हा प्रकार केवळ कायद्याचे उल्लंघन नसून नागरिकांच्या सुरक्षेशी आणि पर्यावरणाशी खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.


Post a Comment
0 Comments