Type Here to Get Search Results !

“अभी ना जाओ छोडकर...” विनंती अपुरीच राहिली!

* स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; आठ दशकांच्या कारकिर्दीत हजारो अजरामर गाण्यांचा अमूल्य ठेवा मागे

मुंबई / मानसी कांबळे :- भारतीय संगीतसृष्टीतील अजरामर आवाज आणि बहुआयामी गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी, 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली असून एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

* अखेर काळाने हिरावला स्वरांचा खजिना :- गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीत संसर्ग, श्वसनाचा त्रास तसेच तीव्र अशक्तपणा जाणवत होता. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉंक्टरांच्या माहितीनुसार हृदयविकारासह इतर गुंतागुंतींमुळे त्यांचे निधन झाले.


* आठ दशकांची उज्ज्वल कारकीर्द :- आशा भोसले यांनी आपल्या तब्बल आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हिंदी, मराठीसह अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये हजारो गीते गायली. चित्रपटसंगीत गजल, पॉप, लोकसंगीत अशा विविध शैलींमध्ये त्यांनी आपल्या सुरेल आवाजाची जादू दाखवली. त्यांच्या गाण्यांमध्ये मराठीतील “गोड गोजिरी लाज लाजिरी”, “ये रे घना”, “चांदणे शिंपित जाशी”, “गोमू संगतीने माझ्या” तसेच हिंदीतील “चुरा लिया है तुमने”, “दिल चीज क्या है” यांसारखी अजरामर गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.


* राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरवलेले व्यक्तिमत्त्व :- आपल्या अद्वितीय योगदानामुळे आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून भारतीय संगीत क्षेत्रात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.

* संगीतविश्वाला धक्का :- आशा भोसले यांच्या निधनाने केवळ एक महान गायिका हरपली नसून भारतीय संगीताचा एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत आहे. देशभरातील कलाकार, राजकीय नेते आणि असंख्य चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


* अजरामर वारसा कायम जिवंत राहणार :- अजरामर सुरांचा अमूल्य ठेवा मागे ठेवून आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला असला, तरी त्यांचा आवाज, गाणी आणि त्यांनी दिलेला संगीतवारसा कायम रसिकांच्या हृदयात जिवंत राहील, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


* भावनिक श्रद्धांजलींचा वर्षाव :- आशा भोसले यांच्या निधनाने केवळ एक महान गायिका हरपली नसून भारतीय संगीताचा एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत आहे. दिवंगत महागायिका आशा भोसले यांच्या पार्थिवाचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मनसे प्रमुख राज ठाकरे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, अभिनेते जॉकी श्रॉफ, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे आदींनी अंत्यदर्शन घेतले. यासह देशभरातील कलाकार, राजकीय नेते आणि असंख्य चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया :- नव्वदी साजरी करणाऱ्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. त्यांचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ पासून ‘खल्लास’पर्यंत विविध शैलींतील गाणी त्यांनी सहजतेने साकारली. मराठी, हिंदीसह 20 भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. बदलांना आत्मसात करणारी अशी अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी ‘अभी ना जाओ छोड़कर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते. आज त्या आपल्यात नाहीत, ही कल्पनाच असह्य आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.


* स्वरांचा तारा मावळला…पण प्रकाश कायम :- स्वरांच्या आकाशातील एक तेजस्वी तारा आज मावळला असला, तरी त्यांचा आवाज हा केवळ गाणं नव्हते, तो प्रत्येकाच्या भावनांना स्पर्श करणारा जिवंत अनुभव होता. कधी आनंदाचे क्षण रंगवणारा, तर कधी दुःखात साथ देणारा… त्यांच्या प्रत्येक सुरात जीवनाची गोडी, वेदना आणि सौंदर्य दडलेले होते. आशा भोसले आज आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या अजरामर गाण्यांतून त्या सदैव जिवंत राहतील. त्यांचे सुर काळाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहतील, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement