* खोपोलीतील जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर खोदकामाचा कहर
* महानगर गॅस कंपनीच्या बेशिस्त कामामुळे अपघातांचा धोका वाढला ; MSRDCच्या भूमिकेवर नागरिकांचे सवाल
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गांवर महानगर गॅस कंपनीकडून सुरू असलेल्या बेशिस्त आणि धोकादायक खोदकामामुळे नागरिक आणि वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. टोल भरूनही सुरक्षित व सुरळीत प्रवास मिळण्याऐवजी प्रवाशांना खड्डे, अडथळे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
* रस्त्यावरच ‘मृत्यूचे सापळे’ :- महानगर गॅस कंपनीकडून महामार्गांवर ठिकठिकाणी बोर मशीन उभी करून सुमारे 5 ते 6 फूट खोल खड्डे खोदले जात आहेत. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टँकरमुळे रस्त्यावर पाणी सांडत असून डांबरी पृष्ठभाग घसरडा बनत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत असून अचानक ब्रेक लागल्यास किंवा वळणावर नियंत्रण सुटल्यास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
* सुरक्षेचा पूर्ण अभाव :- घटनास्थळी कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था, इशारा फलक किंवा वाहतूक नियंत्रण यंत्रणा नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. परिणामी, वाहनचालकांना कोणतीही पूर्वसूचना न मिळता थेट धोक्याचा सामना करावा लागत आहे. दररोज हजारो वाहनचालक या मार्गांवरून प्रवास करीत असतांना त्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
* प्रशासनाची निष्क्रियता उघड, जबाबदार कोण ? :- टोल रस्ता असूनही अशा गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महानगर गॅस कंपनीचे काम MSRDC, खोपोली नगर परिषद, पोलिस प्रशासन आणि टोल वसूल करणारी आयआरबी कंपनी यांच्या परवानगीने सुरू आहे का ? याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परवानगीशिवाय काम सुरू असल्यास संबंधित कंपनी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी केली आहे.
* टोल घेतात, पण सुविधा कुठे ? :- टोल रस्ता म्हणजे उत्तम सुविधा, सुरक्षितता आणि दर्जेदार प्रवास, अशी अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “टोल घेतात, पण सुविधा कुठे ?” असा थेट सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
* MSRDCची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात :- या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महानगर गॅस कंपनीकडून नियमांचे उघड उल्लंघन होत असतांना MSRDC कारवाई का करीत नाही ? संबंधित यंत्रणा मौन का बाळगून आहेत ? या सर्व मुद्द्यांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
* तात्काळ कारवाईची मागणी...अन्यथा आंदोलनाचा इशारा :- महानगर गॅस कंपनीचे सुरू असलेले काम तात्काळ थांबवून योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात, तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. टोलच्या छायेत सुरू असलेला हा ‘धोक्याचा प्रवास’ कधी थांबणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments