* हभप मोनालीताई इंगळे यांचा प्रभावी संदेश
* महिला जनजागृती व संस्कारांवर भर
भिवापूर - विरखंडी (धापरला) / अखिल रोडे :- हनुमान जन्मोत्सवाच्या पवित्र निमित्ताने विरखंडी (धापरला) येथे ग्रामस्थ आणि शारदा माता महिला भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधनात्मक कीर्तन सोहळा उत्साहात पार पडला. 2 एप्रिल 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमात ह.भ.प. मोनालीताई इंगळे यांनी आपल्या ओजस्वी आणि रसाळ वाणीतून ‘काल्याचे कीर्तन’ सादर करीत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
कीर्तनादरम्यान मोनालीताईंनी भक्ती, कर्म आणि जीवनमूल्यांवर प्रभावी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, माणसाने असे कार्य करावे की त्याच्या निधनानंतरही समाजात त्याचे नाव आदराने घेतले जाईल. कर्माचे फळ अटळ आहे, त्यामुळे प्रत्येकाने सत्कर्माचा मार्ग स्विकारावा. महिलांना उद्देशून त्यांनी संघटित होण्याचे आवाहन केले. धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवून आणावे, असे सांगत त्यांनी तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी मंदिर, हरिपाठ व संस्कारक्षम वातावरणाची गरज अधोरेखित केली.
कीर्तनातील ‘कृष्ण जन्म’ देखावा विशेष आकर्षण ठरला. या कार्यक्रमाला वारकरी साहित्य परिषद विदर्भ अध्यक्ष ह.भ.प. डॉं. प्रदीप महाराज इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कीर्तनासाठी मृदंग ह.भ.प. अनिकेत महाराज शेंडे, गायन ह.भ.प. ओम महाराज नान्हे, सचिन महाराज, टाळकरी अमृत महाराज सरोदे, प्रशांत महाराज देवळीकर, सुरज महाराज मोहुरले, आर्याताई वालकटे, अनुष्काताई चौधरी यांनी उत्कृष्ट साथ दिली.
शारदा माता महिला भजन मंडळाने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. मंगला शहारे, सुषमा ठवकर, शालू चौरे, शारदा खवास, नमिता हिंगे, निर्मला हिंगे, चंद्रकला शहारे, संगीता पडोळे, शीला शहारे, लीला ठोकर, रंजू पडोळे, देविदास हिंगे आणि दुधीराम मारबते यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा कीर्तन सोहळा भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.


Post a Comment
0 Comments