* मुंबई GPO येथे जंगी स्वागत ; कर्मचाऱ्यांची बुलंद तोफ म्हणून ओळख
मुंबई / प्रतिनिधी :- ऑल इंडिया पोस्टल एससी-एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनच्या अखिल भारतीय सेक्रेटरी जनरलपदी जयराम जाधव यांची निवड झाल्यानंतर मुंबईतील जीपीओ परिसरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या जाधव यांच्या निवडीमुळे कर्मचारी वर्गांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जयराम जाधव हे पोस्टल विभागातील कर्मचारी प्रश्न, हक्क व कल्याणासाठी लढणारे ठाम आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीमुळेच त्यांना “कर्मचाऱ्यांची बुलंद तोफ” असे संबोधले जाते. त्यांच्या निवडीमुळे संघटनेला नव्या दिशेने बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
निवडीच्या आनंदात मुंबई जीपीओ येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जाधव यांचा भव्य सत्कार केला. यावेळी पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या स्वागत सोहळ्याला संघटनेचे विविध पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने जयराम जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जयराम जाधव यांनी सर्वांचे आभार मानत कर्मचारी कल्याण, हक्क संरक्षण आणि संघटनेची ताकद वाढवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments