Type Here to Get Search Results !

कॉलेज गेट - एक्झाम, एसटी आणि दोस्ती


नमस्कार मित्रांनो…

मी परमेश्वर

बी.ए. राज्यशास्त्र.


मागील बारा वर्ष मुंबईत काढली…धावपळ, गर्दी, लोकल, काम…सगळं अनुभवलं.

पण आता परत आलोय गावाकडे - नगरदेवळा.

कारण?

आयुष्याचा एक अध्याय संपला… आणि दुसरा सुरू करायचा आहे.

पण ते सगळं नंतर…

आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो…

ही गोष्ट माझी एकट्याची नाही 

ही आमच्या सगळ्यांची आहे.


2005 साल.

नगरदेवळा… छोटंसं गाव.

मातीचा वास, सकाळचं धुके, आणि प्रत्येक घरात संघर्ष.

पैसे कुणाकडेच फार नव्हते.

कुणाची बॅग फाटकी, कुणाची आईने शिवून दिलेली.

कपडे साधे - निळा शर्ट, काळी पँट… पण इस्त्री केली की आम्हाला वाटायचं आपणच हिरो!

पण एक गोष्ट सगळ्यांकडे सारखी होती

स्वप्नं.

मोठी… अगदी आकाशाएवढी.


दररोज सकाळी 7 ची “नागद बस” आमच्यासाठी आयुष्याची लाईन होती.

“ए भाऊ, लवकर चल… बस निघून जाईल!”

आईचा आवाज कानात पडायचा आणि आम्ही घाईघाईत घराबाहेर पडायचो.

नगरदेवळा स्टॉपवर पोचायचो तोवर आधीच मंडळी जमलेली असायची.

बसचा रूट ठरलेला 

नगरदेवळा → स्टेशन → सतीचे वडगाव → बाळद → नाचणखेडे → लोहटार → अंतुर्ली → पाचोरा.

पण आमच्यासाठी हा फक्त रूट नव्हता…

हा आमच्या आयुष्याचा दररोजचा प्रवास होता.


बरं, गोष्ट सांगायची तर सुरुवात पहिल्याच प्रवासापासून करायला पाहिजे…

📖 अध्याय 1 - लाल एसटी आणि सुरुवात दुनियादारीची

आमचं गाव - नगरदेवळा.

छोटं, साधं… पण प्रत्येक वळणावर आठवणींची चादर पसरलेली.

2005 साल.

थंडीचा मोसम. सकाळची वेळ अशी की अंगावरचं पांघरूण सोडायची हिंमत होत नव्हती. अंगणात धुक्याची पांढरी चादर अंथरलेली, आणि दूरवर कुठेतरी गाई-म्हशींच्या घंटांचा आवाज येत होता.

रस्त्याच्या कडेला लाल रंगाची एसटी बस धुक्यातून हळूहळू पुढे सरकत येताना दिसायची...


नगरदेवळा ते पाचोरा.

ती बस म्हणजे आमच्यासाठी फक्त वाहन नव्हतं…

तीच आमच्या कॉलेज दुनियेची पहिली पायरी होती.


बस स्टॉप म्हणजे गावाचा चौकच.

तिथं आधीच गर्दी जमलेली.

कोणाच्या केसातून अजून पाणी टपटपत होतं, कुणी घाईघाईत पोहे ढकलून आलं होतं, कुणाच्या खांद्यावर फाटकी बॅग, तर कुणाच्या हातात फक्त एक वही.


राधेश्याम - आमच्या ग्रुपचा लीड. नजरेत चमक, कपाळावर हलकी टिकलीसारखी रेष, घरात धार्मिक वातावरण पण बाहेर दोस्ती आणि गप्पा ह्याचं जग. साधा निळा शर्ट, जीन्स, पायात चपला - त्याची स्वतःची स्टाईल. जसे नाव तसा त्याचा स्वभाव, गोपियांचा लाडका कान्हा...तो सर्वांना हसतमुखाने हाय करत उभा.


अली - शांत, अभ्यासात टॉपर, डोळ्यावर चष्मा, पण नजर नेहमीच तल्लख. हातात सुंदर टापटीप नोट्स, चेहऱ्यावर आत्मविश्वास. 


विनोद - लाजरा पण देखणा. कॉमिक टाइमिंग त्याच्या रक्तात. हातात पिशवी नाही, पण खिशात छोटासा आरसा - केस नीट ठेवण्यासाठी. बस येण्याआधीच एखादा विनोद मारून सगळ्यांना हसवणं हेच त्याचे काम.


सौरभ - चष्म्याच्या काचांमागे अभ्यासात बुडालेला. नोट्स पलटतोय, व्याख्या रिपीट करतोय. पण मन मात्र घाबरतंय - “पहिल्या दिवशी मुलींशी बोलावं की नको?”


ऋग्वेद - श्रीमंत घरचं मूल, उंच, स्मार्ट. ब्रँडेड शर्ट घालून आला आहे, बाकी सगळे त्याच्याकडे थोडा हेवा आणि कौतुकाने पाहतात.



“अरे भाऊ, बस येईपर्यंत नोट्स तरी बघ…”

सौरभ एका कोपऱ्यात उभा राहून वहीत डोकं खुपसून बसलेला.

त्याच्या बाजूला उभा विनोद त्याला चिडवत म्हणाला,

“काय रे, आजच पेपर हाय का ? एवढं काय घोकतोस सकाळी सकाळी!”


सौरभ लाजत म्हणाला,

“नाय रे… तसं थोडं बघतोय.”

विनोद लगेच खदखदून हसला,

“थोडं म्हणे! अरे तू तर लग्नात पण नोट्स घेऊन बसशील!”

(आजूबाजूचे सगळे हसतात.)


राधेश्याम आधीच स्टॉपवर पोचलेला.

साधा निळा शर्ट, जीन्स, पायात चपला… पण चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास.

तो सगळ्यांना पाहून म्हणत होता,

“काय रे भाऊ, तयार सगळे? आजपासून आपली कॉलेज लाइफ सुरू!”

त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं की कुणालाही आपलंसं वाटायचं.

अली थोडा बाजूला उभा.

हातात नीटनेटकी वही, डोळ्यावर चष्मा, चेहऱ्यावर शांतपणा.

तो बस येण्याच्या दिशेने बघत होता… पण खरं तर त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं.

इतक्यात एक हलकीशी सायकल थांबली.

जयश्री उतरली.

गुलाबी ड्रेस, दोन वेण्या, आणि चेहऱ्यावर निरागस हसू.

ती हलकंसं म्हणाली,

“नमस्कार…”

राधेश्याम क्षणभर थबकला.

“हं… नमस्कार…” त्याच्या आवाजात थोडीशी अडखळ होती.

त्या एका क्षणात काहीतरी सुरू झालं होतं… दोघांनाही न कळणारं.


त्याच वेळी वैष्णवी आली.

ती थोडी गंभीर, पण डोळ्यांत काहीतरी खोल.

तिने अलीकडे एक कटाक्ष टाकला.

अली लगेच वहीत डोकं खुपसल्यासारखा झाला…

पण त्याच्या कानाजवळ हलकीशी लालसर छटा स्पष्ट दिसत होती.

फरहीनने सौरभला पुन्हा छेडले,

“अरे अभ्यासू महाराज, मुलींशी बोलायचा विचार कधी करणार?”

सौरभ अडखळत म्हणाला,

“अं… ते… नंतर बघू…”

“नंतर म्हणजे लग्नानंतर का?” फरहीन जोरात हसली.


“धडधडधड…”

लाल एसटी बसचा आवाज दूरून येऊ लागला.

“आली… आली… बस आली!” कुणीतरी ओरडलं.

क्षणात सगळ्यांची धावपळ सुरू.

कंडक्टरचा आवाज घुमला 

“लवकर चढा रे… वेळ नाही!”

बस आतून खचाखच भरलेली.

तरी सगळे कसेबसे एकमेकांना जागा करून बसले.

राधेश्याम खिडकीजवळ उभा.

जयश्री थोडी लांब बसलेली, पण नजर मात्र कधीमधी त्याच्याकडेच.

विनोद ओरडला,

“अरे भाई, पहिल्याच दिवशी बस फुल! आता आपली लव्ह स्टोरी उभी राहील का उभ्याउभ्या?”

नेहा लगेच म्हणाली,

“तुझी स्टोरी सुरू होण्याआधीच संपेल!”

(सगळे पुन्हा हसतात.)


खिडकीतून गार वारा अंगावर येत होता.

धुक्यातून शेतं दिसत होती...कापूस, केळी, मोकळे रस्ते.

एखादा मुलगा गाणं गुणगुणायला लागला

“काय दिसतं गं…”

बाकी मित्र टाळ्या वाजवू लागले.

त्या क्षणी सगळ्यांना जाणवत होतं

आपलं आयुष्य बदलायला लागलंय.


पाचोरा कॉलेज आलं.

मोठं गेट, आत गर्दी, चहाच्या टपऱ्यांचा वास, पुस्तकांच्या दुकानांची रांग, सिनियर मुलांचा ग्रुप मोठमोठ्याने हसत उभा.

“काय रे, नवीन माल आलाय वाटतं…”

सिनियर मुलांनी चिडवलं.

सौरभ घाबरला.

विनोद म्हणाला,

“घाबरू नको रे, आपण पण कमी नाही!”

राधेश्याम सगळ्यांकडे बघत म्हणाला,

“ऐका भाऊ… आता इथंच आपलं सगळं घडणार… दोस्ती, भांडण, प्रेम… सगळं!”

अली हलकंसं हसला.

वैष्णवीने मान हलवली.

जयश्रीने एकदा राधेश्यामकडे पाहिलं… आणि लगेच नजर वळवली.

विनोदने खोटं गंभीर चेहरा करत म्हटलं,

“आणि माझी भावी GF पण याच गेटमधून बाहेर येणार!”

नेहा म्हणाली,

“पहिल्यांदा तू पास हो… मग GF बघ!”

त्या दिवशी आम्ही सगळे कॉलेजच्या गेटमधून आत पाऊल टाकलं…

पण खरं तर,

आम्ही आयुष्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत होतो.

आज मागे वळून बघताना जाणवतं

तो दिवस फक्त प्रवास नव्हता…

ती लाल एसटी फक्त बस नव्हती…

तो होता आमच्या दुनियादारीचा पहिला अध्याय.

पहिल्या प्रेमाची चाहूल,

पहिल्या मैत्रीचा हशा,

आणि स्वप्नांच्या नव्या दुनियेची सुरुवात…

- (कॉलेज गेट - एक्झाम, एसटी आणि दोस्ती, लेखक - फिरोज पिंजारी) 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement