* मुंबईत ‘बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर’ प्रदर्शनाचे उद्घाटन
* देश-विदेशातील ऐतिहासिक स्थळांची पवित्र माती, 153 देशांचे ध्वज आणि तैलचित्रांचे आकर्षण
मुंबई / प्रतिनिधी :- महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जागतिक प्रभाव अधोरेखित करणाऱ्या “बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर” या अनोख्या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ऐतिहासिक स्थळांवरील मातीचे संकलन करून ती येथे प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये कोलंबिया विद्यापीठ (अमेरिका), लंडन, महू (मध्यप्रदेश), आंबेटेंबे (मुरबाड), आंबडवे (मंडणगड), पुणे, कोल्हापूर, सोलापूर, हैदराबाद, आग्रा, नेपाळ आदी ठिकाणांचा समावेश आहे. या संकल्पनेचे प्रमुख डॉं. राजेंद्र जाधव यांनी विविध ठिकाणांहून ही माती संकलित करून प्रदर्शनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याचा जागतिक प्रवास प्रभावीपणे मांडला आहे.
प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिव्यांग चित्रकार नितीन खरात यांनी साकारलेली डॉं. आंबेडकरांची तैलचित्रे विशेष आकर्षण ठरत आहेत. तसेच, 153 देशांचे राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करून बाबासाहेबांच्या विचारांची वैश्विकता अधोरेखित करण्यात आली आहे. याशिवाय शिल्पकार अतिश पालवनकर यांनी साकारलेली शाई पेनाची निप (Pen Nib Sculpture) पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की, डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती दलित आणि सवर्ण समाजातील नाती दृढ करते. बाबासाहेबांचे विचार कोणत्याही देशाच्या सीमा मानत नाहीत. त्यामुळे ‘बॉर्डरलेस बाबासाहेब’ हे नाव अत्यंत समर्पक आहे.
या कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, जिल्हाध्यक्ष संजय पवार, संयोजक डॉं. राजेंद्र जाधव, प्रा. हेमंत सामंत, पत्रकार कुणाल कांबळे, सदानंद येलवे, विजय सुराडकर, डॉंं. वैभव देवगीरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments