* पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल : गुरु-शिष्य नात्याला काळीमा
* पालकांमध्ये भीतीचे वातावरण, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
महाड (रायगड) / प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील महाड येथे गुरु - शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. 2024 - 25 या कालावधीत ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संबंधित शिक्षक सुनील गांधी यांनी विद्यार्थ्याचा विश्वास संपादन करून त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, शिक्षकाने विद्यार्थ्याशी अयोग्य वर्तन करीत अश्लील कृत्य केले. तसेच क्लासच्या वरच्या मजल्यावर नेऊन जबरदस्तीने गैरवर्तन केल्याचा आरोपही नोंदविण्यात आला आहे. या प्रकारामुळे पीडित विद्यार्थी मानसिक धक्क्यात गेला असून, कुटुंबीयांनी पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता तसेच ‘बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


Post a Comment
0 Comments