Type Here to Get Search Results !

गाव बदलायचं असेल तर सरपंच डोकेबाज पाहिजे!

* भास्करराव पेरे पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

* शिंदेवाडीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त व्याख्यान

* पाटोदा मॉडेलचा आदर्श ठेवत सर्वांगीण विकासाचा संदेश

शिंदेवाडी (ता. माळशिरस) / अनिल पवार :- श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिंदेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणादायी व्याख्यानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात पाटोदा गावाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहिले होते.

या व्याख्यानाचा मुख्य उद्देश पाटोदा गावाच्या विकासाचा आदर्श समोर ठेवून शिंदेवाडी गावाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणे हा होता. आपल्या साध्या, प्रभावी आणि वास्तववादी शैलीत बोलतांना पेरे पाटील यांनी गावविकासासाठी केवळ निधी नव्हे, तर योग्य नियोजन, पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्व अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले.


यावेळी त्यांनी पाटोदा गावात राबविलेल्या यशस्वी उपक्रमांचा आढावा घेतला. त्यामध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, पाणी नियोजन व जलसंवर्धन, शिक्षण व डिजिटल सुविधा, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन या सर्व उपक्रमांमुळे पाटोदा गावाचा झालेला कायापालट त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केला.


* इच्छाशक्ती असेल तर गाव बदलते :- सरपंचाकडे प्रामाणिक इच्छाशक्ती असेल, तर गावाचे चित्र बदलू शकते, असे ठामपणे सांगत त्यांनी नेतृत्वातील प्रामाणिकपणा आणि निर्णयक्षमता यावर भर दिला. तसेच, गाव हा आपला परिवार आहे आणि त्याच्या विकासाची जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थाची आहे, असे सांगत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.


* 'डोकेबाज’ सरपंचाची गरज अधोरेखित :- जर पाटोदा गाव बदलू शकते, तर शिंदेवाडीही नक्की बदलू शकते, त्यासाठी सरपंच डोकेबाज पाहिजे, या त्यांच्या विधानाने उपस्थितांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.


या प्रेरणादायी व्याख्यानामुळे ग्रामस्थांमध्ये विकासकामांसाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा निर्माण झाली. अनेकांनी गावाच्या उन्नतीसाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला. अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विकासाला निश्चितच गती मिळेल, असा आशावाद व्यक्त होत असून शिंदेवाडी गावाच्या विकासासाठी ही बैठक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement