Type Here to Get Search Results !

खोपोली भाजी मार्केट रस्त्यावर अतिक्रमणाचा सुळसुळाट

* राजकीय छत्रछायेत हातगाड्यांचे बेकाबू अतिक्रमण ?वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

* नगर परिषदेकडून ठोस कारवाईचा अभाव ; नागरिकांचा संताप वाढला

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरातील मध्यवर्ती भाजी मार्केट परिसरात हातगाड्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र दिसत आहे. मुख्य रस्त्यावर वाढलेल्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

भाजी मार्केट परिसरातील फुटपाथ आणि पादचारी मार्ग पूर्णतः अडवले गेल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.


स्थानिक नागरिकांच्या मते, या अतिक्रमणामागे काही हातगाडीवाल्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्यानेच प्रशासन कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. “मोठ्या नेत्यांच्या छत्रछायेत अतिक्रमण फोफावत आहे,” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.


खोपोली नगर परिषदेकडून अधूनमधून अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबविल्या जात असल्या तरी त्या केवळ औपचारिक ठरत असल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांतच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजी मार्केट परिसरातील वाढते अतिक्रमण हे केवळ वाहतूक कोंडीचे कारण नसून शहराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. प्रशासनाने ठोस आणि कठोर भूमिका घेतली नाही, तर भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement