* लेखक देवेंद्र भुजबळ यांची प्रभावी लेखणी : माध्यम, कला आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या संघर्ष आणि यशकथांचा दस्तऐवज
माध्यम आणि कला-साहित्य क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी जीवनकहाणी उलगडणारी “माध्यमभूषण” आणि “कला साहित्य भूषण” ही दोन पुस्तके लेखक देवेंद्र भुजबळ यांनी साकारली आहेत. ग्रंथाली प्रकाशनाने उत्कृष्ट निर्मिती केलेली ही पुस्तके ‘न्यूज स्टोरी टुडे’तर्फे प्रकाशित करण्यात आली असून वाचकांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि माहितीचा समृद्ध ठेवा ठरतात.
* माध्यमभूषण :- कुणी वर्तमानपत्रात, कुणी दूरदर्शन वा अन्य वाहिन्यांवर, कुणी आकाशवाणी, कुणी चित्रपट आदी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या वा निवृत्त झालेल्या दिग्गज मंडळींनी जे कर्तृत्व दाखवले, त्यांच्या कार्याची, त्यांच्या कर्तृत्वाची कुणी तरी दखल घ्यायला पाहिजे होती, ती देवेंद्र भुजबळ यांनी घेतली आणि लोकांसमोर त्यांना आणले. आपण फक्त नावे ऐकून असतो, पण प्रत्यक्ष ती व्यक्ती कोण आहे, त्यांनी काय केले, याची कल्पना नसते.
"माध्यमभूषण'' मध्ये पहिलीच व्यक्तिरेखा प्रसिद्ध साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची आहे. अनेक प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले एवढेच आपल्याला माहिती असते. परंतु ते वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतांना त्यांचे जनसंपर्क अधिकारी होते, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी होते, हे कुणाला माहितच नाही.
दूरदर्शन मधून संचालक म्हणून निवृत्त झाल्यावर याकूब सईद यांनी गेल्या तीस वर्षांत मराठी, हिंदी मिळून चाळीस चित्रपटांमध्ये विविध महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, हे वाचून आश्चर्यच वाटते.
प्रा. सुरेश पुरी यांनी अतिशय कष्टातून शिक्षण घेतले. पुढे ते डॉं. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अध्यापन करून वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या पण त्यावर त्यांनी कशी मात केली, कुणाकुणा विद्यार्थ्याला त्यांनी कशी मदत केली, याचे यथार्थ दर्शन भुजबळ यांनी या पुस्तकातून घडवले आहे.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे पहिल्या तुकडीचे पदवीधर प्रदीप दीक्षित मुंबई दूरदर्शन केंद्रात पूर्णवेळ संहिता लेखक होते. त्यांनी 50 पेक्षा अधिक मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद लिहिल्या आहेत. काहींचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे, आजही ते कार्यरत आहेत.
कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर 84 व्या वर्षीही पत्रकारितेत सक्रिय आहेत, या क्षेत्रातील लोक सोडले तर कुणाला त्यांच्याबद्दल ही माहिती आहे ?
दूरदर्शनवर मराठी बातम्या वाचणाऱ्या वासंती वर्तक या लोकप्रिय वृत्तनिवेदिका होत. त्यांच्याबाबत आपणांस कल्पना असली तरी त्यांची पहिली मुलगी मेंदू विकाराने आजारी असतांनाही त्यांनी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. अनेक अडीअडचणींना तोंड देत त्या कशा पुढे गेल्या हे त्यांच्याबद्दल वाचून समजले.
पत्रकार- चित्रकार प्रकाश बाळ जोशी, दूरदर्शन निर्मात्या डॉं. किरण चित्रे, जेष्ठ अष्टपैलू माध्यमकर्मी बी. एन. कुमार, दूरदर्शनचे निवृत्त उप महासंचालक शिवाजी फुलसुंदर, जेष्ठ पत्रकार मधु कांबळे, कवी तथा आकाशवाणीचे निवृत्त सहायक संचालक डॉं. महेश केळुस्कर, नागपूर येथील जेष्ठ माध्यमकर्मी अविनाश पाठक, मुंबई येथील इंग्रजी पत्रकार रोनिटा टाॅरकेटो, रामायण फेम कॅमेरामन अजित नाईक, अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते छायाचित्रकार डॉं. नितीन सोनवणे, नेदरलॅंडमधील पत्रकार- सामाजिक कार्यकर्त्यां प्रणिता देशपांडे, नागपूर येथील संपादिका शोभा जयपूरकर, महाभारतचे सहायक संकलक विनय वैराळे, विनोद गणात्रा, सिद्धार्थ कुलकर्णी, किसन हासे, माधव गोगावले, डॉं. सुचिता पाटील, रत्नाकर तारदाळकर, मेघना साने, पत्रकार राजू झनके, रणजित चंदेल, शिवाजी गोंडाळ, नितीन बिनेकर, स्मिता गवाणकर, मर्मबंधा गव्हाणे, नीला बर्वे, सुदेश हिंगलासपूरकर, मीनाताई घोडविंदे आणि अमेरिकेतील लेखिका तथा कर्करोग संशोधक डॉं. सुलोचना गवांदे आदी विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वाचे पैलू भुजबळ यांनी या पुस्तकात उलगडून दाखविले आहेत. यातील प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किती खस्ता खाल्ल्या, अनेक अडचणींवर कशी मात केली, हे या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते.
निसर्गाने प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुण बहाल केलेले असतात. मात्र ते ओळखण्याचा चाणाक्षपणा आपल्याजवळ हवा असतो. आपल्यातील गुण कसे विकसित करावे, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असले तरी भुजबळ यांनी अशा व्यक्तीरेखा निवडल्या, ज्यांच्याकडे वेगळेपण आहे, या सर्वांकडून प्रेरणा घेण्यासारख्या आहेत.
हे पुस्तक लिहिण्यासाठी भुजबळ यांनी किती परिश्रम घेतले, हे पुस्तक वाचल्यानंतरच कळते. त्यांचे 'माध्यम भूषण' पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे आहे.
* कला - साहित्य भूषण :- दुसरे पुस्तक 'कला - साहित्य भूषण' हे देखील तितकेच वाचनीय तर आहेच पण कोण कुठून आला, कसा आला आणि आपले वेगळेपण कसे सिद्ध केले, त्यावरून त्या त्या व्यक्तीबद्दलची माहिती मिळते. त्या त्या व्यक्तीच्या प्रेरककथा या पुस्तकात आहेत.
भीमराव पांचाळे गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईत असल्यामुळे ते मुंबईकरच आहेत असे आपणास वाटते. परंतु ते मूळ अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील आष्टगावचे आहेत. स्टेट बँकेतील नोकरीमुळे ते मुंबईत आले. तेव्हापासून ते इकडेच स्थिरावले. भीमराव पांचाळे हे काही तसेच कलाकार झाले नाही तर इतर शिक्षणाबरोबरच त्यांनी संगीत क्षेत्रातील पदवी संपादन केली. 9 वर्ष ते शास्त्रीय संगीत शिकले. आज ते गझल सम्राट म्हणून ओळखले जातात. खुद्द ज्यांचा गझल सम्राट असा नावलौकिक आहे, त्या सुरेश भट यांनी भीमराव पांचाळे यांना गझल सम्राटाची उपाधी दिली. त्यामुळे पांचाळे किती मोठे कलावंत आहेत, याची कल्पना येते.
गप्पागोष्टी फेम म्हणून ज्यांची ओळख आहे, ते जयंत ओक मूळचे मुंबईकर आहेत. गेल्या 33 वर्षात त्यांनी भारतातच नव्हे, तर विदेशातही गप्पागोष्टीचे 1900 कार्यक्रम केले आहेत, यावरून त्यांची कलात्मकता दिसून येते.
प्रा. विसुभाऊ बापट यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्यामुळे अफाट असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांपर्यंत कविता पोहचावी म्हणून त्यांनी 'ओंकार काव्य दर्शन ' हा कार्यक्रम 1976 साली सुरू केला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम आजतागायत सुरू आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत 1250 पेक्षा अधिक शाळांमध्ये कार्यक्रम झाले. तसेच जवळपास 1500 पेक्षा अधिक आदिवासी आश्रम शाळांमध्ये त्यांनी विनामूल्य कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाबरोबरच 'कुटुंब रंगलंय काव्यात' हा त्यांचा कार्यक्रमही लोकप्रिय असून या एकपात्री प्रयोगाचे जवळपास 3 हजारपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. सलग 11 तास मराठी कविता सादरीकरणाचा विक्रम त्यांच्या नावावर असून 'लिम्का बुक'मध्ये त्यांची नोंद झाली. तर सप्टेंबर 2015 मध्ये मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात सलग 15 तास मुखोद्गत कविता त्यांनी सादर केल्या. त्याचा विक्रमही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. म्हणजे माणूस किती काम करू शकतो, आणि त्यांना किती ही दैवी शक्ती प्राप्त झाली, याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.
भुजबळ यांनी चित्रपट समीक्षक - लेखक अशोक राणे, दूरदर्शन निर्माती मीना गोखले पानसरे, प्रा. डॉं. गणेश चंदनशिवे, लेखिका प्रतिभा सराफ, गायिका - लेखिका प्रा. डॉं. मृदुला दाढे, लोक कलावंत रेश्मा मुसळेकर परितेकर, सिंगापूर स्थित लेखिका - कवयित्री मोहना कारखानीस, शाहीर सुरेशकुमार वैराळकर, अमेरिकेतील लेखिका - कवयित्री डॉं. गौरी जोशी कंसारा, नाशिक येथील गायिका विजयालक्ष्मी मणेरीकर, चार्ली चापलिन वरप्रभ शिरगावकर ऊर्फ चार्ली चापलिन, केमान आयलन्स येथील चित्रकार - लेखिका शिल्पा तगलपल्लेवार गंपावार, राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद, विदर्भातील गायक सुरेश दंडे, चित्रकार माधवी पाटील, एकपात्री हास्य कलाकार बंडा जोशी, चित्रकार विजयराज बोधनकर, लेखक - संशोधक , जनसंपर्क अधिकारी डॉं. आलोक जत्राटकर, नगरचे नाटककार डॉं. शाम शिंदे, लेखिका डॉं. उषा रामवाणी गायकवाड, वारली चित्रकार मधुकर वाडू, चित्रकार प्रतिभा रावळ, लेखक नागेश शेवाळकर, लेखक - संशोधक धर्मपाल कांबळे, कलाकार कुटुंब रझाक, वृषाली आणि रायता, चित्रकार रमेश औंधकर आणि दूरदर्शन निर्माते रविराज गंधे आदींची गुण वैशिष्ट्ये या पुस्तकातून समोर आणली आहेत. हे पुस्तकही जरूर वाचले पाहिजे, म्हणजे कोण काय आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही.
- परिक्षण : शेषराव वानखेडे (ज्येष्ठ पत्रकार)
ह. मु. गांधीनगर, गुजरात (मो. 9869484800)



Post a Comment
0 Comments