* टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत 100 दिवसीय मोहिमेची दमदार सुरुवात
रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ‘टी.बी. मुक्त भारत अभियान’ अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ 24 मार्च 2026 रोजी जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात करण्यात आला. हा उद्घाटन सोहळा पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, देशभरात एकाच वेळी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन सोहळ्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले.
या कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि आरोग्य विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या 100 दिवसीय मोहिमेत क्षयरोग रुग्णांची लवकर ओळख, वेळेवर उपचार, जनजागृती अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. “टी.बी. मुक्त भारत” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सक्रिय भूमिका घेतली आहे.
* जनजागृती व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा :- क्षयरोग निर्मूलनासाठी केवळ प्रशासन नव्हे तर नागरिकांचाही सहभाग आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. वेळेवर तपासणी, उपचार आणि जागरूकता यामुळे हा आजार पूर्णपणे नियंत्रित करता येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments