* अफवांमुळे नागरिकांत गोंधळ, प्रशासनाचे स्पष्ट आवाहन
* चंद्रपूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध
* अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
चंद्रपूर / संजय बागडे :- चंद्रपूर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये अनावश्यक भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा आणि नियमित साठा उपलब्ध आहे. इंधन पुरवठा साखळी व्यवस्थित कार्यरत असून संबंधित कंपन्या आणि प्रशासन यावर सतत देखरेख ठेवत आहेत. अफवांमुळे नागरिक पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यात सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, भीतीपोटी इंधन साठविण्याचा किंवा जादा खरेदी करण्याचा प्रयत्न करू नये, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अधिकृत शासकीय स्रोतांवरूनच माहिती घ्यावी.
* अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा :- प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, खोटी माहिती पसरविणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आणि संबंधित कंपन्यांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि संयम राखावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आवाहन केले आहे.


Post a Comment
0 Comments