Type Here to Get Search Results !

अवैध वाळू उपसा थांबवा, अन्यथा कठोर कारवाई अटळ

* चाळीसगावात रात्रीच्या गस्तीत डंपर-ट्रॅक्टर जप्त

* तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई

चाळीसगाव / प्रतिनिधी :- चाळीसगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कडक आणि आक्रमक भूमिका घेतली असून, महसूल विभागाच्या विशेष पथकांकडून सुरू असलेल्या रात्रीच्या गस्त मोहिमेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. नदीकाठांवरून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर अंकुश ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या स्वतंत्र पथकांकडून दररोज रात्रभर गस्त घालण्यात येत आहे. या कारवाईला आता ठोस यश मिळू लागल्याचे दिसून येत आहे.

* तीन दिवसांत मोठी कारवाई :- गेल्या तीन दिवसांत महसूल प्रशासनाने धडक कारवाई करीत एक डंपर आणि दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या वाहनांद्वारे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. संबंधित वाहनमालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना दंडात्मक नोटीसही बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाळू चोरी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


* अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग :- तहसीलदार प्रशांत पाटील आणि नायब तहसीलदार एस. बी. निकुंभ यांनी केवळ आदेश देण्यापुरते न थांबता स्वतः मैदानात उतरून कारवाईला गती दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकांनी सातत्याने रात्रगस्त घालत वाळू माफियांवर प्रभावी अंकुश ठेवला आहे. त्यांच्या कठोर निर्णयक्षमतेमुळे आणि पारदर्शक कारभारामुळे प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.


* “खडक मोहीम” राबविणार :- तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले की, पुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध ‘खडक मोहीम’ राबवून मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केले जातील. संबंधितांना पोलिसांसमोर हजर करून फौजदारी कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला.


काही दिवसांपूर्वी वाळूच्या डंपरमुळे झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे प्रशासन अधिक सजग झाले असून वाळू माफियांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. फक्त नफा कमावण्यासाठी मानवी जीव धोक्यात घालणे अमान्य आहे, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले.


* सीसीटीव्ही यंत्रणेचा विचार :- अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नागरिकांना आवाहन केले होते. मात्र काही ठिकाणी भीतीपोटी नागरिकांनी सहकार्य करण्यास नकार दिल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासन आता स्वतःहून सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या तयारीत असून यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.


तालुक्यातील नदीकाठांवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत होता. तसेच जड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला होता. आता प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेमुळे या परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


अलीकडील कारवाईनंतर महसूल विभागाचा धाक निर्माण झाला असून अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतूक तात्पुरती थांबल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement