* शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित ?
* 400 - 500 तरुणांसह मोठा नेता ही तयारीत
* आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा आणि परिसरातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, लवकरच ‘राजकीय भूकंप’ घडण्याची चर्चा रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 400 ते 500 तरुण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किशोर आप्पा पाटील आणि जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
* मोठ्या नेत्याच्या प्रवेशाने वाढणार राजकीय तापमान :- या पक्षप्रवेशात केवळ तरुणांचाच सहभाग नसून, नगरदेवळा आणि परिसरातील एक प्रभावी लोकनेता आपल्या कुटुंबीय, लोकप्रतिनिधी आणि समर्थकांसह शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे नगरदेवळा जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मास्टरस्ट्रोक’ ? :- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू असतांनाच हा पक्षप्रवेश होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पार्टीकडून भक्कम उमेदवार आणि नवनेतृत्व उभे केले जात असतांना, शिवसेनेचा हा डाव ‘मास्टरस्ट्रोक’ ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
* तरुणांची मोठी फौज देणार संघटनेला नवी ऊर्जा :- विशेष म्हणजे, या पक्षप्रवेशात सामाजिक संघटना, मित्र मंडळे, व्यायामशाळांशी निगडीत आणि आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध नसलेले शेकडो तरुण सहभागी होणार आहेत. यामुळे शिवसेना हा नगरदेवळा जिल्हा परिषद गटातील सर्वात तरुण कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
* आमदार किशोर पाटील यांच्या संघटन कौशल्याची चर्चा :- आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संघटन कौशल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची त्यांची क्षमता या घडामोडीतून स्पष्ट होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
नगरदेवळा परिसरात या संभाव्य पक्षप्रवेशामुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधकांमध्येही खळबळ उडाली आहे. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेकांच्या स्वप्नांना या पक्ष प्रवेशाने सुरूंग लागणार असल्याचे समजते. हा पक्षप्रवेश केवळ एक राजकीय कार्यक्रम न ठरता नगरदेवळा परिसरातील राजकारणाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. आता प्रत्यक्ष प्रवेश कधी आणि किती प्रमाणात होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment
0 Comments