* फुटपाथ गिळंकृत, प्रशासन गप्प का ?
* नगर परिषद कार्यालयालगतच नियम धाब्यावर
* मोठ्यांवर कारवाई नाही, सर्वसामान्यांवरच का ?
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगर परिषद कार्यालयासमोरच अतिक्रमणाचा उघड उघड बाजार भरला असून फुटपाथ पूर्णपणे गिळंकृत झाल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. शहराचे नियोजन करणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नगर परिषद कार्यालयालगत असलेल्या इमारतीतील गाळाधारकांनी दुकाने 20 ते 25 फूट पुढे वाढवून तब्बल 300 ते 400 स्क्वेअर फूट जागेवर अनधिकृत कब्जा केल्याचे दिसून येत आहे. फुटपाथवर लोखंडी जाळ्या, पत्र्याचे शेड, स्टॉल्स आणि विविध साहित्य ठेवून सार्वजनिक जागेचे रूपांतर खासगी मालमत्तेत करण्यात आले आहे. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे नगर परिषदेच्या समोरच कापडी पडदे लावून अनधिकृत हॉटेल उभारण्यात आले आहे. हे सर्व प्रशासनाला दिसत नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्यातील अंतर कमी झाल्याने अपघातांची शक्यता देखील वाढली आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई करते. मात्र मोठ्या व्यावसायिकांवर आणि राजकीय प्रभाव असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करते. जर शहर अतिक्रमणमुक्त करायचे असेल, तर सुरुवात नगर परिषदेच्या परिसरातूनच व्हायला हवी, अशी मागणी जोर धरत आहे.
खोपोली बाजारपेठ, समाज मंदिर रोड, जैन मंदिर परिसर आणि झेनिथ कॉर्नर या भागांतही अतिक्रमणाचे साम्राज्य कायम असल्याचे चित्र आहे. काही टपऱ्यांना परवाना असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी त्यांचा विस्तार आणि अतिक्रमणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी केली असून लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments