* मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
* श्री हनुमान मंदिरात पूजा-अर्चना, महाप्रसाद
कोराडी (जि. नागपूर) / प्रतिनिधी :- ऊर्जा व औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोराडी-महादुला परिसरात श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. श्रीवास नगर, महादुला येथील समाज भवन हनुमान मंदिरात श्री हनुमानजींच्या विग्रहाचा गंगाजल व पंचामृताभिषेक करून विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली.
या उत्सवप्रसंगी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंदिरात भेट देऊन श्री हनुमानजींचे दर्शन घेतले व पूजा-अर्चना करून आशीर्वाद घेतला. यावेळी नगराध्यक्ष हेमलता सावजी, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी, तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हनुमान जयंतीनिमित्त सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. “जय श्रीराम” आणि “जय बजरंगबली”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तांनी श्रद्धा व भक्तिभावाने सुंदरकांड व रामायण पठण, हनुमान चालीसा सामूहिक वाचन, विशेष पूजा-अर्चना यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
* ध्वजारोहण, छप्पन भोग व भजन संध्या :- कोराडी परिसरातील विविध मंदिरांमध्ये ध्वजारोहण, छप्पन भोग, भजन संध्या आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कोराडी मंदिर संस्थान, सिंचन कॉलनी, विद्युत वसाहत तसेच नवीन कोराडी येथील मंदिरांमध्येही हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
* धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा संगम :- धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेला भगवान शिवांच्या अकराव्या रुद्रावताराचे रूप असलेल्या श्री हनुमानजींचा जन्म झाला असल्याने या दिवशी विशेष पूजेला महत्त्व आहे. हनुमान जयंती हा सण साहस, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी भक्तांनी सुख-समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.


Post a Comment
0 Comments