Type Here to Get Search Results !

द्रमुक सरकार उलथवुन टाका !

* केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

* तामिळनाडूत आरपीआयचे 18 उमेदवार रिंगणात

कोईमतुर / प्रतिनिधी :- तामिळनाडू विधानसभेच्या एकुण 234 जागांपैकी 18 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असून उर्वरित 216 जागांवर एनडीएला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाचा दृष्टीकोन दक्षिणेतील जनतेलाही पटलेला आहे. एनडीए सरकारने देशाचा वेगाने केलेला विकास पाहुन दक्षिणेतही एनडीएचा महाविजय होणार आहे. अभिनेते विजय यांनी तामिळनाडूत सर्व जागांवर उमेदवार उतरविल्याने मतविभागणीचा लाभ भाजप आणि एनडीएला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तामिळनाडुतील स्टॅलिन यांचे द्रमुक  सरकार उलथवुन टाका, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

कोईमतुर जिल्ह्यातील त्रिपुर नॉर्थ विधानसभा मतदारसंघाच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला उमेदवार के. कार्तिकादेवी यांच्या निवडणुक प्रचार रॅलीला संबोधित करतांना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष फादर एन सुसाई आणि अनेक रिपब्लिक पदाधिकारी  उपस्थित होते.  


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे दोन दिवसांच्या तामिळनाडु दौ-यावर आले असून आज त्यांनी कोईमतूर आणि नामक्कल जिल्ह्यातील विविध मतदार संघात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा तसेच भाजप प्रणित एनडीए उमेदवारांचा प्रचार केला. रिपब्लिकन पक्षाच्या तामिळनाडूमध्ये 18 उमेदवारांमध्ये 5 उमेदवार हे अनुसुचित जातीचे 11 उमेदवार हे इतर मागास वर्गातील असून 2 उमेदवार हे मुस्लिम आहेत.  


तामिळनाडु हे दक्षिणेतील महत्वाचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए यंदा तामिळनाडू, पाँडेचेरी आणि केरळ या सर्व राज्यांवर विजय मिळवुन एनडीएचा दक्षिण विजय निश्चत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 57 कोटी लोकांचे बँक खाते खोललेले आहे. 50 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा लाभ दिला आहे. 6 कोटी लोकांना उज्वला योजनेद्वारे सिलेंडर गॅस दिलेला आहे. 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेला आहे. देशभरातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेली आहे. देशभरातील अनेक रस्ते चांगले करण्यात आलेले असून देशाची आर्थिक व्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आलेली आहे. देशात विकास झपाट्याने होत आहे. भारताचे उपराष्ट्रपती असणारे सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे सुपुत्र आहेत. तामिळनाडुच्या जनतेला तामिळनाडुचे सुपुत्र उपराष्ट्रपती झाल्याचा अभिमान आहे. तामिळनाडूच्या यंदाच्या निवडणुकीत विजय या सुपरस्टार अभिनेत्याने आपल्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मताची विभागणी होणार आहे. याचा लाभ एनडीएला होणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.


मोदींनी अनेक चांगल्या योजना राबविल्यामुळे देशाचा विकास होत आहे. देशाच्या विकासाचे राजकारण जनतेला आवडणारे असल्याने तामिळनाडूत जनता यंदा एनडीएला महाविजय मिळवुन देईल, असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 


महिलांना संसदेत राजकीय आरक्षण देणारे महिला विधेयक संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंजुर करणार असून महिलांच्या आयुष्यात क्रांती घडविणारे हे विधेयक आहे. त्यामुळे देशभरातील महिला या विधेयकावर खुष आहेत. तामिळनाडूतील महिला सुध्दा या विधेयकामुळे आपल्या मतांचे दान एनडीए उमेदवारांना देतील. त्यामुळे तामिळनाडूमध्ये एनडीएचा महाविजय होईल. यंदाच्या निवडणुकीत द्रमुकचा निश्चित पराभव होईल असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.  

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement