* वंचितांसाठी झटणाऱ्या कार्याची घेतली गेली दखल
* स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलनात झाला सन्मान
खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील एक योध्दा ॲंड. प्रल्हाद विश्वनाथ बट्टेवार यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानासाठी घेत ‘डॉं. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ पुरस्कार नुकताच अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या बट्टेवार यांच्या कार्याचा हा सन्मान मानला जात आहे.
शुक्रवार, 3 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता महाड तालुक्यातील ‘फाउंटन इन (लिमोनेट लीला)’ येथे ‘स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलन 2026’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते ॲंड. बट्टेवार यांचा गौरव झाला. या कार्यक्रमाचे आयोजन आई फाउंडेशन रायगड (भारत) व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड यांच्या वतीने करण्यात आले होते.
लहानपणापासूनच सामाजिक कार्याची ओढ असलेल्या ॲंड. बट्टेवार यांनी अवघ्या 13 व्या वर्षी समाजकार्यात पहिले पाऊल टाकले. 1990 पासून त्यांनी सक्रियपणे विविध सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला. 2003 पासून अखिल भारतीय मातंग संघाच्या माध्यमातून त्यांनी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य केले असून आज ते रायगड जिल्हा व कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
उच्च शिक्षणाच्या बळावर त्यांनी सामाजिक कार्य अधिक सक्षमपणे केले आहे. त्यांनी एम.ए. (इतिहास, राज्यशास्त्र, मराठी, आंबेडकर स्टडीज), एम.एस.डब्ल्यू., एल.एल.बी., एल.एल.एम. (मानवी हक्क) तसेच विविध पदव्या संपादन केल्या आहेत. या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी समाजातील अनेकांना कायदेशीर मार्गदर्शन करून न्याय मिळवून दिला आहे. मातंग समाजाला 8 टक्के आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी रास्ता रोको आंदोलन, मंत्रालयात मोर्चे तसेच नागपूर अधिवेशनात सक्रिय सहभाग घेतला आहे. खोपोली शहरात ‘अण्णाभाऊ साठे सभागृह’ उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून 2013 मध्ये ते पूर्णत्वास नेले. तसेच अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा त्यांनी रुजवली.
सामाजिक कार्यासोबतच त्यांनी कामगार क्षेत्रातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कामगारांच्या हक्कांसाठी लढा देत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. गरीब व गरजू नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये मदत करणे आणि कायदेशीर सल्ला देणे ही त्यांची सातत्याची सेवा आहे.
ॲंड. बट्टेवार यांना यापूर्वीही अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये समाजभूषण पुरस्कार (महाराष्ट्र शासन) 2023-24, गुणवंत कामगार पुरस्कार 2025 तसेच राज्यस्तरीय 17 पुरस्कारांचा समावेश आहे. आता ‘डॉं. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ हा त्यांच्या कार्याला मिळालेला आणखी एक सन्मान आहे.


Post a Comment
0 Comments