Type Here to Get Search Results !

अंतुर्ली खुर्दमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

* बकरींचा फडशा पाडत शेतकऱ्याचे मोठे नुकसान

* एकाच रात्री 6 जनावरांचा बळी ; भीतीचे वातावरण

* वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पाचोरा / फिरोज पिंजारी :- तालुक्यातील अंतुर्ली खुर्द (प्र. लोहारा) येथे बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात दहशत पसरली असून एका शेतकऱ्याच्या बकरींचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकूण 6 जनावरे मृत्युमुखी पडली असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंतुर्ली खुर्द येथील शेतकरी शरीफ खान आमिर खान (गट क्रमांक 64/2) यांच्या शेतात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात 3 बकरे, 2 बकरी आणि एक वासरू ठार झाल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी खदीजा मॅडम, सरिता मॅडम आणि रोहिणी सोनार मॅडम यांनी पंचनामा केला. यासोबत पोलीस पाटील भागवत मानिक पाटील तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉं. हेमंत नागणे यांनीही घटनास्थळी पाहणी करून अहवाल तयार केला. वन विभागाकडून संबंधित नुकसानीचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.


या घटनेनंतर अंतुर्ली खुर्द परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. आता जनावरांसह माणसांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


* वन विभागाकडे ठोस उपाययोजनांची मागणी :- स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, परिसरात गस्त वाढवावी, ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


* वन्यजीव - मानव संघर्ष वाढतोय :- या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीव - मानव संघर्षाचा मुद्दा समोर आला आहे. जंगलाच्या हद्दी कमी होणे आणि मानवी वस्ती वाढल्याने बिबट्यासारखे वन्यप्राणी गावांकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अंतुर्ली खुर्द येथील या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली असून अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement