* सहज सेवा फाउंडेशनचा समाजजागृतीचा प्रभावी संदेश
* खोपोलीत भव्य आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
खोपोली / प्रतिनिधी :- आर्थिक अडचणींमुळे विवाहासाठी कर्जबाजारी होणाऱ्या कुटुंबांना दिलासा देत सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने 2 एप्रिल 2026 रोजी श्रीराम मंगल कार्यालय, खोपोली येथे भव्य आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. “कर्ज काढून लग्न करू नका, सामुदायिक विवाहाचा पर्याय निवडा” हा प्रभावी सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सहज सेवा फाउंडेशनकडून मागील 11 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. 5 सप्टेंबर 2021, 2 एप्रिल 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांत यशस्वीरीत्या सामुदायिक विवाह सोहळे पार पडले असून यंदाचा सोहळा ही त्या परंपरेचा पुढील टप्पा ठरला.
* कर्जमुक्त विवाहाची संकल्पना ठरतेय प्रभावी पर्याय :- आजच्या काळात मुलामुलींच्या शिक्षणावर मोठा खर्च झाल्यानंतर विवाहासाठी अनेक कुटुंबांना कर्ज घ्यावे लागते. परिणामी आयुष्यभर आर्थिक ताण सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून सामुदायिक विवाह सोहळा हा प्रभावी पर्याय ठरत असून याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
* विवाहासह प्रमाणपत्र व संसारोपयोगी साहित्य :- या सोहळ्यातील सर्व विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने निश्चित करण्यात आले होते. विवाहानंतर प्रत्येक जोडप्याला अधिकृत नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्र, संसारोपयोगी साहित्य देण्यात आले, ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली.
सहज सेवा फाउंडेशन विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यामध्ये 2016 पासून वैद्यकीय उपकरणे सेवा, 2019 पासून रुग्णालयात निःशुल्क भोजन, 2020 पासून ‘सहज स्वर्ग रथ’ व शवपेटी सेवा, आदिवासी पाड्यांवर जनजागृती, शाळा - कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण व सायबर क्राईम मार्गदर्शन, ‘झाडाखालची शाळा’ सारखा राज्यभर गाजलेला उपक्रम, कन्या जन्माचा सन्मान यांसारखे अनेक उपक्रम राबविले जात असून त्यांची नोंद राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे.
या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी नवदाम्पत्यांना आशिर्वाद दिले.
या उपक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे, प्रकल्प प्रमुख जयवंत सिद व दिवेश राठोड यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे पौरहित्य अजित दीक्षित यांनी केले, तर सूत्रसंचालन विनोद सोळंकी यांनी केले. या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला असून समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. कर्जमुक्त विवाहाची ही संकल्पना ग्रामीण व शहरी भागात अधिक प्रभावीपणे राबविली गेल्यास सामाजिक बदल घडविण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Post a Comment
0 Comments