* कलावंतांवर छेडछाड व मारहाण ; तमाशा कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
संगमनेर / प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या तमाशा कलेला पुन्हा एकदा काळिमा फासणारी घटना घारगाव येथे घडली आहे. विठाबाई नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तमाशा मंडळाच्या गाड्या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबल्या असतांना काही अज्ञात समाजकंटकांनी गाडी आडवी लावून अडथळा निर्माण केला. यानंतर त्यांनी तमाशा फडातील महिला कलाकारांची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला चालकाने शांततेने विरोध करीत समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला उत्तर म्हणून समाजकंटकांनी हल्ला चढविला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना केवळ एक अपवाद नसून तमाशा कलाकारांना वारंवार अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर येत आहे. गावोगावी यात्रा काळात कार्यक्रम सादर करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कलाकारांना सन्मानाऐवजी अपमान आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो, ही दुर्दैवी बाब आहे.
तमाशा ही महाराष्ट्राची ओळख आणि मातीचा अभिमान मानली जाते. मात्र, त्याच कलेसाठी आयुष्य वाहणाऱ्या कलाकारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने समाजाच्या विवेकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “ज्यांच्या कलेवर आपण टाळ्या वाजवतो, त्यांच्याच सन्मान आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो,” अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.
* खान्देश तमाशा परिषदेचा निषेध :- या घटनेचा खान्देश तमाशा परिषदेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. कार्याध्यक्ष शेषराव गोपाळ आणि प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कलावंतांच्या सुरक्षेसाठी तमाशा फडांना पोलिस संरक्षण उपलब्ध करणे, यात्रा समित्या व ग्रामस्थांनी समन्वय साधणे, महिला कलाकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना, समाजकंटकांवर कठोर कारवाई अशा उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.


Post a Comment
0 Comments