Type Here to Get Search Results !

सावंतवाडीत दुहेरी आत्महत्येने खळबळ

* 18 वर्षीय युवतीनंतर 27 वर्षीय नातेवाईकानेही जीव संपविला

* काही मिनिटांत दोन जीव गेले : कारण अस्पष्ट,  पोलिसांचा तपास सुरू

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :- सावंतवाडी शहरातील बिरोडकर टेंब परिसरात घडलेल्या दुहेरी आत्महत्येच्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कोकण हादरला आहे. 18 वर्षीय युवतीने घरात गळफास घेतल्यानंतर काही मिनिटांतच तिच्या जवळच्या नात्यातील 27 वर्षीय युवकानेही टेकडीवरील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रांजल वैभव बिरोडकर (वय 18) हिने गुरुवारी दुपारी सुमारे अडीच वाजता राहत्या घरातील बंद खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. प्रांजलने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि ती घरीच होती. दुपारी धार्मिक कार्यक्रमावरून परतल्यानंतर ती खोलीत गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने आईने पाहणी केली असता दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉंक्टरांनी घोषित केले. 


या घटनेची माहिती मिळताच प्रांजलचा नातेवाईक अभिजीत तुकाराम बिरोडकर (वय 27) घटनास्थळी आला होता. मात्र काही वेळाने तो अचानक बेपत्ता झाला. त्याचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे चिवार टेकडी परिसरात शोध घेतला असता एका उंच झाडावर साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिजीतचा मृतदेह आढळून आला.


* कुटुंबावर दुःखाचा डोंगर :- या दुहेरी घटनेमुळे बिरोडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रांजल ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती, तर अभिजीतच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. दोघेही स्वभावाने मनमिळावू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.


दोघांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सावंतवाडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी प्रांजलचे काका प्रशांत बिरोडकर आणि अभिजीतचे काका दीपक बिरोडकर यांनी तक्रार दिली आहे.


* सलग घटनांमुळे परिसर हादरला :- याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा दोन तरुण जीव गेल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement