* आरोपी रंगेहात पकडला : 'कल्याण’ मटका चालवितांना कारवाई, 3,045 रुपयांचा मुद्देमाल जप्त
खालापूर / नरेश जाधव :- खालापूर तालुक्यातील खोपोली बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (LCB) रायगड यांनी धडक कारवाई करीत एका आरोपीस रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे LCB पथकाने खोपोली बाजारपेठ (ता. खालापूर, जि. रायगड) येथे सापळा रचला. दरम्यान, आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे घेऊन ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून आरोपीस रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 116/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 3,045 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये विविध दरांच्या भारतीय चलनी नोटांसह मटका जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच एलसीबी (LCB)चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या धाडीत सपोनि मानसिंग पाटील, सहायक फौजदार संदीप पाटील, पोलिस हवालदार प्रतीक सावंत, रवी मुंडे, रणजितसिंह खराडे, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप खरात यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, पेट्रोलिंगदरम्यान रणजितसिंह खराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
खोपोली परिसरात बेकायदेशीर जुगार व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments