* लाकडी कलाकृतींनी विद्यार्थ्यांची देशात पाचवी कामगिरी ; नवी दिल्लीहून प्रमाणपत्र प्राप्त
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवली आहे. विद्यालयातील विद्यार्थी पुरुषोत्तम सुखदेव मिस्त्री आणि गौरव विनोद मिस्त्री यांनी आपल्या कल्पकतेचा, चिकाटीचा आणि अथक मेहनतीचा उत्कृष्ट नमुना सादर करीत लाकडी कलाकृतींच्या माध्यमातून जेसीबी यंत्र, पोकलँड मशीन आणि लातूर ट्रॅक्टरची अचूक प्रतिकृती तयार केली. या अभिनव आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणामुळे त्यांना राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशभरातून पाचवा क्रमांक मिळविण्यात यश आले. या यशाचे प्रमाणपत्र शुक्रवार, 10 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथून प्राप्त झाले असून संपूर्ण नगरदेवळा गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
नगरदेवळ्यासारख्या लहान गावात मर्यादित साधने आणि सुविधा असतांनाही विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. गावात कौशल्याला वाव देण्यासाठी आवश्यक संसाधनांचा अभाव असतानाही या विद्यार्थ्यांनी हार न मानता आपली प्रतिभा सिद्ध केली. या यशामागे विद्यालयातील प्रा. उमेश काटकर आणि एस. एच. जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. त्यांनी विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा दिली. प्रा. उमेश काटकर यांनी पुरुषोत्तम आणि गौरव यांच्या कौशल्याला धार देत त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केले. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच हा संघ टप्प्याटप्प्याने यश संपादन करीत अखेर देशात पाचवा ठरला.
या यशामध्ये ग्राम शिक्षण समिती आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचेही मोठे योगदान आहे. उपाध्यक्ष सुभाष थेपडे, मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, आप्पासाहेब पाटील, वामन पाटील, अ. गनी शेख तसेच प्राचार्य किरण काटकर यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वातावरण मिळाले. या यशामुळे नगरदेवळा गावाचे नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड क्षमता असते, हे या कामगिरीने सिद्ध करून दाखवले आहे.
दै. कोकण प्रदेश न्यूज, केपी न्यूज, देशवाणी न्यूज, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन आणि डिके फाउंडेशन ऑंफ फ्रीडम अँड जस्टिस यांच्या वतीने संपादक फिरोज पिंजारी यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. नगरदेवळ्यासारख्या छोट्या गावातून राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे. या यशामुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.


Post a Comment
0 Comments