* जिल्हा परिषद उर्दू शाळेत प्रेरणादायी कार्यक्रम
* विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भडगाव / निलेश महाले :- कजगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले समता परिषद आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच समाजसुधारक शेख फातिमा यांसारख्या थोर समाजसुधारकांच्या विचारांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांच्या कार्याचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व पटवून देत या महान व्यक्तींच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाबद्दलची प्रेरणा अधिक दृढ झाली. कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, पत्रकार अमिन शहा, शाळा समिती अध्यक्ष अन्वर तांबोळी, मुख्याध्यापिका शेख बुरानुद्दीन, मोईनुद्दीन, सादिया बेगम, खलील अहमद, शाहीना खान, आफिफ खान, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थ भास्कर मोरे, भिकन महाजन, राजेंद्र महाजन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख बुरानुद्दीन सर यांनी केले, तर आभार शाहीना खान यांनी मानले.


Post a Comment
0 Comments