Type Here to Get Search Results !

नवी मुंबई विमानतळ विस्ताराला वेग

* तिसऱ्या धावपट्टीसाठी व्यवहार्यता अभ्यास सुरू

* प्रवासी वाढ लक्षात घेऊन सिडकोचे महत्त्वपूर्ण पाऊल

नवी मुंबई / दशरथ कांबळे :- मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई प्रवासी मागणीच्या पार्श्वभूमीवर सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी मोठा निर्णय घेतला आहे. विमानतळावर तिसरी धावपट्टी विकसित करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अभ्यास सुरू करण्यात आला असून या अभ्यासासाठी RITES Limited आणि Creative Group LLP (जॉइंट व्हेंचर) यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15 एप्रिल 2026 रोजी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या तांत्रिक, आर्थिक आणि नियोजनात्मक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. सिडकोचे वरिष्ठ अधिकारी तसेच सल्लागार संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


विजय सिंघल यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ पूरक प्रकल्प नसून मुंबई महानगर प्रदेशासाठी भविष्यातील जागतिक दर्जाचे एव्हिएशन हब ठरणार आहे. प्रवाशांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता तिसरी धावपट्टी आवश्यक ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत दुहेरी विमानतळ प्रणालीचा भाग म्हणून कार्य करणार आहे. देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाची पूर्ण क्षमता गाठल्यानंतर दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवासी, 3.2 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता असेल. सुमारे 1160 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात सुरुवातीला दोन समांतर धावपट्ट्या आणि चार टर्मिनल्स विकसित करण्यात येणार आहेत. मात्र, 2040 पर्यंत प्रवासी संख्या 150 दशलक्ष (MPPA) 2047-50 दरम्यान 240 दशलक्ष पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे अतिरिक्त क्षमतेची गरज अधोरेखित झाली असून तिसऱ्या धावपट्टीचा प्रस्ताव पुढे आला आहे.


प्रस्तावित व्यवहार्यता अभ्यासामध्ये खालील बाबींचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. तिसऱ्या धावपट्टीची तांत्रिक क्षमता, ऑपरेशनल कार्यक्षमता, पर्यावरणीय परिणाम, आर्थिक व्यवहार्यता हा अभ्यास पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


तिसऱ्या धावपट्टीचा प्रस्ताव हा केवळ विस्तार नसून भविष्यातील वाढत्या मागणीसाठी एक धोरणात्मक आणि दीर्घकालीन निर्णय मानला जात आहे. वधावन येथे तिसऱ्या विमानतळाचा प्रस्ताव असला तरी विद्यमान नवी मुंबई विमानतळाचा विस्तार हा अधिक व्यवहार्य पर्याय म्हणूनही पाहिला जात आहे. या विस्तारामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून नवी मुंबई विमानतळ भविष्यात जागतिक स्तरावरील एव्हिएशन हब म्हणून विकसित होण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement