Type Here to Get Search Results !

अनेक लाडक्या बहीणींना योजनेचा लाभ मिळेना !

* कर्जत - खालापूर तालुक्यात महिलांचा संताप उसळला

* हप्ते गायब, आश्वासने हवेत...नाक्यानाक्यावर चर्चेला उधाण

* पात्र असूनही लाभ न मिळाल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. कर्जत शहरासह तालुक्यातील विविध भागांत या विषयावर जोरदार चर्चा सुरू असून, पात्र असूनही लाभ न मिळाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता, नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यापासून अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणारे योजनेचे हप्ते अचानक थांबले आहेत. विशेष म्हणजे, अनेक महिलांनी आवश्यक असलेली e-KYC प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात आजतागायत एकही रक्कम जमा झालेली नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


सोशल मीडियावर “नोव्हेंबरचा हप्ता लवकरच जमा होईल” अशा आश्वासनांची चर्चा रंगली होती. मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे सलग पाच महिने उलटून एप्रिल महिना सुरू झाला, तरीही लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही. त्यामुळे या आश्वासनांची विश्वासार्हताही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


योजनेच्या अंमलबजावणीवर आता थेट प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही पात्र असूनही लाभ का मिळत नाही ? असा सवाल अनेक महिलांनी उपस्थित केला आहे. यामुळे कर्जत-खालापूर तालुक्यात नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.


वंचित महिलांकडून प्रशासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये बंद पडलेले हप्ते तात्काळ सुरू करावेत, प्रलंबित रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी, योजनेतील तांत्रिक आणि प्रक्रियात्मक अडचणी दूर कराव्यात. अशा मागण्यांचा समावेश आहे. तसेच, लोकप्रतिनिधी आणि शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन पात्र महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


* e-KYC साठी मुदतवाढ तरीही लाभाबाबत अनिश्चितता :- दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत e-KYC सुधारणा करण्यासाठी यापूर्वी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. अवकाळी पाऊस व गारपीट तसेच महिलांच्या मागणीनंतर ही मुदत आता 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्ष लाभ खात्यात केव्हा जमा होणार, याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे.


निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याची खंतही महिलांनी व्यक्त केली आहे. आश्वासने दिली जातात, पण अंमलबजावणी का होत नाही ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.


या पार्श्वभूमीवर शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन, पात्र महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी कर्जत - खालापूर तालुक्यातील महिलांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement