Type Here to Get Search Results !

गुंडगे येथे महिलांसाठी उद्योग मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न

* आधार जनसेवा सामाजिक संस्थेचा पुढाकार

* महिलांना उद्योजकतेकडे वळविण्याचा प्रयत्न

कर्जत / नरेश जाधव :- महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने गुंडगे (ता. कर्जत) येथील बुद्ध विहार हॉलमध्ये रविवार, 5 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले मोफत उद्योजक कौशल्य विकास व उद्योग मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिबिरामध्ये महिलांना शासकीय योजनेंतर्गत उपलब्ध उद्योग संधी, अनुदान प्रक्रिया, व्यवसाय सुरू करतांना येणाऱ्या अडचणी तसेच प्रभावी मार्केटिंग आणि नेटवर्किंगचे तंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध क्षेत्रांतील संधींची माहिती देण्यात आली. यामध्ये शिवणकाम व हस्तकला, अन्नप्रक्रिया उद्योग, घरगुती व्यवसाय, ऑनलाईन विक्री व डिजिटल पेमेंट्स, स्वयंसहाय्यता गट (Self Help Group) या क्षेत्रांमध्ये महिलांनी स्वतःचा उद्योग उभा करून कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावावा, असे आवाहन मार्गदर्शकांनी केले.


या शिबिरासाठी रायगड कृषी उद्योग विभागाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षक दयानंद चतुर तसेच नवी मुंबई येथील संवेदना सामाजिक फाउंडेशनच्या मोहिनी बागडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून महिलांना उद्योजकतेच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित केले.


या शिबिराचे आयोजन आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा मीनाक्षी भवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे आणि कार्याध्यक्ष राजेंद्र जंगम यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.


यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सतीश बर्गे, तालुका सचिव तुषार कांबळे, खजिनदार संगीता कांबळे, उपाध्यक्ष संदीप पावसकर, कांता काळे, प्रणाली मोरे, अशोक कांबळे, महेंद्र बनसोडे, प्रसाद कांबळे, रश्मी कांबळे, दीपाली रोकडे, यशोदा भालेराव, सारिका माने, संतोष भवार, सुरज यादव, सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांसाठी नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी अशा प्रकारचे कौशल्य विकास शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement