* बाळासाहेब भवन येथे खालापूर तालुक्याची आढावा बैठक संपन्न
* संघटन बळकटी, जनगणना व आगामी निवडणुकांवर भर, आमदार महेंद्र थोरवे यांचे मार्गदर्शन
खालापूर-कर्जत / सुधीर माने :- खालापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक 4 एप्रिल 2026 रोजी कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे दुपारी 12 वाजता पार पडली. ही बैठक कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या बैठकीस खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, पंचायत समिती उपसभापती भाई शिंदे, खालापूर नगर पंचायती नगराध्यक्षा रोशन मोडवे, खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उत्तर रायगड जिल्हा महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, शहर प्रमुख, युवा व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान तालुका प्रमुख संदेश पाटील, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन औसरमल आणि भाई शिंदे यांनी पक्ष संघटन, स्थानिक प्रश्न आणि आगामी निवडणुकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी संघटन अधिक बळकट करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव सभेनंतर प्रथमच ही आढावा बैठक होत आहे. ते पुढे म्हणाले की, 24 वर्षांनंतर होणारी जनगणना महत्त्वाची असून त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बीएलओ (BLO) यांच्या कामावर पक्षाचे बीएलए (BLA) यांनी सतत लक्ष ठेवावे. प्रत्येक वार्डात जनगणना प्रक्रिया व्यवस्थित पार पडते आहे का, याची खातरजमा करावी. सर्व लोकप्रतिनिधींनी 15 एप्रिलपूर्वी आपल्या वार्डातील मतदान केंद्रांवर बीएलए नियुक्त करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच संघटन वाढीसाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत विकासकामांची माहिती पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
जनगणनेनंतर लोकसभा व विधानसभा मतदारसंघात सदस्यसंख्या वाढ होण्याची शक्यता असून महिलांना अधिक आरक्षण मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी सर्वांनी सज्ज राहून नियोजनबद्ध काम करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक गावातील बैठकीत मी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार, असे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले.
ही आढावा बैठक संघटनात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments