Type Here to Get Search Results !

नराधम मुख्याध्यापकाकडून 10 वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार ; आरोपीला अटक

धरणगाव / फारूख शेख :- तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी आणि समाजमन सुन्न करणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील नराधम मुख्याध्यापकाने चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 10 वर्षांच्या चिमुरडीवर मागील दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नराधम मुख्याध्यापक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी धरणगाव तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह राहते आणि स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी मुख्याध्यापक नंदलाल मराठे हा शाळा भरण्यापूर्वी सकाळी 10 वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने या चिमुरडीला शाळेत आधी बोलावून घेत असे. त्यावेळी शाळेत इतर कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करायचा. इतकेच नव्हे, तर तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण केले जात होते.


या घृणास्पद प्रकाराला चिमुरडीने विरोध केल्यास नराधम मुख्याध्यापक तिला बेदम मारहाण करायचा. तसेच, याबद्दल कोणालाही काही सांगितल्यास 'तुझे आई-वडील मरून जातील,' अशी भीतीदायक धमकी देऊन तो तिला गप्प बसवत असे. या जाचाला कंटाळलेली पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यानंतर आपल्या मावशीकडे राहण्यास गेली. तिथे गेल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली आणि तिने जेवण करणेही बंद केले. मुलीच्या बदललेल्या वर्तनामुळे काळजीग्रस्त झालेल्या नातेवाईकांनी तिला प्रेमाने विश्वासात घेतले असता, तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला हा संपूर्ण भयानक प्रकार उघड केला.


शाळेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच 30 एप्रिल रोजीही या नराधम मुख्याध्यापकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित मुख्याध्यापक नंदलाल मराठे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच धरणगाव पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत. विद्यामंदिराला कलंकित करणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली असून या नराधम मुख्याध्यापकाला जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरतम् शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement