Type Here to Get Search Results !

वसई शेतकरी सहकारी सोसायटीतर्फे 22 ते 24 मे दरम्यान भव्य आंबा महोत्सव

* विविध प्रकारच्या आंब्यांसह ग्रामीण उत्पादने, खाद्यपदार्थ आणि शेती अवजारांचे प्रदर्शन

* प्रयोगशील शेतकरी मनोहर भोईर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

विरार / नरेंद्र पाटील :- वसईतील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वसई शेतकरी सहकारी सोसायटीतर्फे शुक्रवार, 22 मे ते रविवार 24 मे 2026 या कालावधीत भव्य “आंबा महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नागरिक आणि आंबा प्रेमींसाठी हा महोत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे.

या आंबा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, 22 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रयोगशील शेतकरी मनोहर भोईर (आंबोडे) यांच्या हस्ते होणार आहे. सफरचंद शेतीची यशस्वी लागवड करून वेगळी ओळख निर्माण करणारे मनोहर भोईर यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


महोत्सवामध्ये हापूस, पायरी, केशर, तोतापुरी यांसह विविध जातींचे दर्जेदार आंबे प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना आंबे खरेदी करण्याची संधी मिळणार असल्याने या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या महोत्सवात मागासवर्गीय बांधवांनी बांबूपासून तयार केलेल्या शोभेच्या तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. ग्रामीण कला, हस्तकला आणि स्वावलंबनाला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. जयवंत वाडेकर (दादा) यांच्या “जय अँग्रो प्रोडक्ट” माध्यमातून शेती आणि बागायतीसाठी लागणारी विविध आधुनिक अवजारे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेले विविध पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने आणि ग्रामीण स्वादही नागरिकांना अनुभवता येणार आहे.


वसई शेतकरी सहकारी सोसायटीचे चेअरमन आशय हरेश्वर राऊत यांनी नागरिकांना या महोत्सवाला भेट देण्याचे आणि स्थानिक शेतकरी व बचत गटांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध व्हावीत, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आंब्यांचा सुगंध, ग्रामीण संस्कृतीची झलक, शेतीविषयक माहिती आणि स्थानिक उत्पादनांचा मेळ अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement