Type Here to Get Search Results !

बाळदच्या माहेरवासीणीसाठी भर उन्हातील प्रवास ठरला जीवघेणा

* मोहाडीतील 20 दिवसाच्या नववधूचा उष्माघाताने मृत्यू

* वैशाली मोरे यांच्या अकाली निधनाने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

* चोपडा येथून भर उन्हात दुचाकीने प्रवास ; उष्माघाताची लक्षणे दिसताच उपचारादरम्यान मृत्यू

पाचोरा / प्रतिनिधी :- तालुक्यातील मोहाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून भर उन्हात केलेला प्रवास एका नवविवाहितेच्या जीवावर बेतला आहे. उष्माघातामुळे 20 वर्षीय नववधूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली सुनील मोरे असे मृत तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या विवाहाला अवघे 20 दिवसच झाले होते.

मृत वैशाली यांचे माहेर भडगाव तालुक्यातील बाळद येथे असून काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह मोहाडी येथील सुनील बाळू मोरे यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत साठवून त्या नव्या आयुष्याची सुरुवात करीत होत्या. मात्र नियतीने क्रूर घाला घालत त्यांच्या संसाराला सुरूवातीलाच काळोख दिला.


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी वैशाली या दुचाकीने चोपडा येथे गेल्या होत्या. सध्या जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट असून तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे. अशा कडक उन्हात प्रवास केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. बुधवारी घरी परतल्यानंतर त्यांना अचानक मळमळ, चक्कर येणे, अंगात अशक्तपणा जाणवणे आणि अस्वस्थता अशी उष्माघाताची लक्षणे जाणवू लागली. कुटुंबीयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.


नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉं. कोमल देसले यांनी तपासणी केली असता उष्माघाताची गंभीर लक्षणे आढळून आली. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैशाली यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.


दरम्यान, जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डॉंक्टरांच्या मते, भर दुपारी उन्हात प्रवास करणे, शरीरात पाण्याची कमतरता होणे आणि उष्णतेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत अनावश्यक प्रवास टाळणे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे, शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि उष्णतेपासून बचाव करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.


लग्नाच्या आनंदाचे वातावरण असतांना अचानक आलेल्या या दुःखद घटनेमुळे मोहाडी, बाळद आणि परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. अवघ्या 20 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या मुलीचा असा दुर्दैवी अंत होणे अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement