* सरपंच सेवा संघ महाराष्ट्राकडून गौरव ; शेतकरी, आपत्ती सुरक्षा आणि शासन योजनांच्या जनजागृतीबद्दल राज्यस्तरीय सन्मान
कोर्लई - मुरूड / राजीव नेवासेकर :- संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविणे, शेतकऱ्यांना आपत्ती सुरक्षा विषयक मार्गदर्शन करणे तसेच ग्रामीण भागात जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्य करणारे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रगतिशील शेतकरी व प्राध्यापक डॉं. जयपाल पाटील यांना यंदाचा ‘समाज भूषण राज्यस्तरीय सन्मान 2026’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील अग्रेसिव सरपंचांसाठी कार्यरत असलेल्या स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला असून, संघटनेचे चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.
दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा डॉं. जयपाल पाटील यांच्या ग्रामीण विकास, शेतकरी मार्गदर्शन, शासन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि आपत्ती व्यवस्थापन जनजागृती या क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार जाहीर करतांना संघटनेच्या निवड समितीने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण अत्यंत चिकाटीने, आत्मविश्वासाने आणि सामाजिक बांधिलकी जपत आपले ध्येय साध्य केले आहे. समाजहितासाठी केलेल्या आपल्या संघर्षाचा आणि उल्लेखनीय कार्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘समाज भूषण राज्यस्तरीय सन्मान 2026’ पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली आहे.।हा भव्य राज्यस्तरीय गौरव सोहळा रविवार, 5 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड येथे संपन्न होणार आहे. हा सोहळा सरपंच सेवा संघाचे समर्थक नेते बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. तसेच बबनराव पावसे पाटील, रोहित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. डॉं. जयपाल पाटील यांच्या या राज्यस्तरीय निवडीमुळे रायगड जिल्ह्यासह शेतकरी वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Social Plugin