Type Here to Get Search Results !

हरवलेले मोबाईल पुन्हा हातात

* खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांना मोठे यश

* 40 नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद

* 8 लाखांहून अधिक किमतीचे मोबाईल हस्तगत

खोपोली / प्रतिनिधी :- गर्दीत, प्रवासात किंवा नकळत हरवलेला मोबाईल परत मिळेल, अशी आशा अनेकजण सोडून देतात. मात्र, खोपोली पोलिसांनी आपल्या तत्परतेने, तांत्रिक कौशल्याने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल 40 नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला आहे.

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध नागरिकांनी मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींचा गांभीर्याने तपास करीत पोलिसांनी ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) या आधुनिक प्रणालीचा प्रभावी वापर केला. त्याद्वारे सुमारे 8 लाख 24 हजार रुपये किंमतीचे तब्बल 40 मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, हे मोबाईल केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागांसह इतर राज्यांमध्ये वापरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषण, माहिती संकलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढले.


23 मे 2026 रोजी खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.


विशेष बाब म्हणजे, यापूर्वीही खोपोली पोलिसांनी 122 गहाळ मोबाईल हस्तगत केले होते. आतापर्यंत एकूण 162 मोबाईल फोन, अंदाजे 40 लाख 31 हजार 300 रुपये किंमतीचे, शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.


ही उल्लेखनीय कामगिरी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉं. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड, रामा मासाळ, निलेश कांबळे, वाल्मीक वाडगे, शुभम जाधव, किरण देवकाते, आकाश डोंगरे, समीर पवार आणि प्रशांत दबडे यांनी अथक परिश्रम व तांत्रिक कौशल्याच्या जोरावर ही मोहीम यशस्वी केली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement