Type Here to Get Search Results !

ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ 20 मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल बंद


* अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेची हाक 

          * नगरदेवळ्यातील औषध दुकानदारही सहभागी 

नगरदेवळा / हसीबूर शेख :- बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलती आणि पारंपरिक औषध विक्रेत्यांवर वाढत चाललेला आर्थिक दबाव यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) बुधवार, 20 मे रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत नगरदेवळा परिसरातील सर्व औषध विक्रेत्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

अलिकडच्या काही वर्षांत ऑनलाईन औषध विक्रीचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढले आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या सवलती जाहीर करीत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या छोट्या मेडिकल दुकानदारांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याची भावना औषध विक्रेत्यांमध्ये व्यक्त होत आहे.


औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, औषध विक्री हा केवळ व्यवसाय नसून तो थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे. डॉंक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अनेक औषधे ऑनलाईन उपलब्ध होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन फार्मसीवर कठोर नियम लागू करावेत आणि बेकायदेशीर विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


स्थानिक औषध विक्रेत्यांनी सांगितले की, ऑनलाईन विक्रीत अनेकदा नियमांचे उल्लंघन होत असून औषधांचा चुकीचा वापर वाढण्याची शक्यता आहे. रुग्णाला प्रत्यक्ष मार्गदर्शन न करता औषधे देणे धोकादायक ठरू शकते. आज मेडिकल दुकानदारांवर आर्थिक संकट आले असले, तरी हा मुद्दा केवळ व्यापारापुरता मर्यादित नाही, तो नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेशी निगडित आहे, असे मत अनेक विक्रेत्यांनी व्यक्त केले.


20 मे रोजी नगरदेवळा आणि परिसरातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात येणार असून औषध विक्रेत्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरात या बंदला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून औषध विक्रेता संघटनांनी विशेष खबरदारी घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीत लागणारी जीवरक्षक औषधे आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना आवश्यक औषधांचा तुटवडा भासणार नसल्याचे सांगण्यात आले.


औषध विक्रेत्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भातील स्पष्ट आणि कठोर धोरण जाहीर करावे, बेकायदेशीर ई-फार्मसींवर कारवाई करावी आणि छोट्या व्यापाऱ्यांचे संरक्षण करावे. अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement