Type Here to Get Search Results !

जळगाव विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून रावसाहेब पाटील यांना संधी द्या!

* 'चहा पे चर्चा’तून मागणीला जोर : पाचोरा-भडगावच्या राजकारणात रंगू लागल्या नव्या समीकरणांच्या चर्चा

* रावसाहेब जिभू विधान परिषदेत गेले तर किशोर आप्पा पाटील यांना मिळेल मोठी राजकीय ताकद

* जिल्हा प्रमुख म्हणून संघटनबांधणी, निवडणुकांतील यशस्वी रणनीतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

पाचोरा - नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 16 विधान परिषद जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक आमदार निवडून द्यायचा असल्याने विविध पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांना विधान परिषदेत पाठवावे, अशी मागणी आता ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.

विशेष म्हणजे, नगरदेवळा बाजारपेठेतील ‘चहा पे चर्चा’मध्ये देखील सध्या हाच विषय रंगताना दिसत आहे. रावसाहेब पाटील यांच्यासारखा जमिनीवर काम करणारा नेता विधान परिषदेत गेला पाहिजे, अशा प्रतिक्रिया आता उघडपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत.


* "2029 चे उमेदवार” म्हणून किशोर आप्पांनी आधीच केले संकेत :- पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते की, भविष्यात स्वतंत्र होणाऱ्या भडगाव - नगरदेवळा विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब जिभू हे शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे रावसाहेब पाटील यांचे नाव आधीपासूनच राजकीय चर्चेत आहे.


आता विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रावसाहेब पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोरदार आग्रह धरावा, अशी मागणी शिवसैनिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.


* पाचोरा-भडगावमध्ये ‘मास लिडर’ म्हणून ओळख :- राजकीय वर्तुळात रावसाहेब पाटील यांची ओळख ‘मास लिडर’ अशी मानली जाते. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारी शैली आणि संघटन उभारण्याची क्षमता यामुळे त्यांनी अल्पावधीत स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.


शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी भडगाव-पाचोरा परिसरात मजबूत संघटन उभे केले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने केलेल्या दमदार कामगिरीमागे त्यांची संघटनात्मक रणनीती महत्त्वाची मानली जाते. तसेच, पाचोरा-भडगाव नगर परिषद निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विरोधकांचा अक्षरशः सफाया करीत निर्भेळ यश मिळवले होते.


* जिल्हा परिषद गटाचे दोनदा नेतृत्व, आदर्श सरपंच म्हणूनही ओळख :- रावसाहेब पाटील यांनी नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटाचे दोन वेळा नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर निपाणे गावचे आदर्श सरपंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विकासाभिमुख भूमिका, जनसंपर्क आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविल्यामुळे त्यांचा प्रभाव वाढत गेल्याचे मानले जाते.


* किशोर आप्पांना मिळेल मोठी ताकद :- राजकीय चर्चांमध्ये आता आणखी एक मुद्दा जोर धरतांना दिसत आहे. दिवाळीपूर्वी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची, आणि झालेच तर पालकमंत्री पदाचीही माळ पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


अशावेळी रावसाहेब पाटील यांच्यासारखा विश्वासू सहकारी विधान मंडळात असेल, तर किशोर आप्पा पाटील यांना जिल्हास्तरावर मोठी राजकीय ताकद मिळू शकते, असे मत शिवसैनिक आणि स्थानिक राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.


* चहा पे चर्चेतून वाढतेय मागणी :- नगरदेवळा, भडगाव, पाचोरा परिसरात सध्या राजकीय गप्पांचे केंद्र विधान परिषद निवडणूक बनली आहे. बाजारपेठ, चौक, टपऱ्या आणि चहा स्टॉलवर “यावेळी रावसाहेब जिभूंना संधी मिळाली पाहिजे,” अशी चर्चा रंगताना दिसत आहे. “जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यांना विधान परिषदेत पाठविले तरच स्थानिक प्रश्नांना न्याय मिळेल,” अशी भावना सामान्य शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.


* कोणत्या जिल्ह्यांवर राज्याचे लक्ष ? :- या निवडणुकीत पुणे, ठाणे, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर - जालना, रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग, सांगली - सातारा, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली, धाराशिव - लातूर - बीड आणि परभणी - हिंगोली या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. राजकीय समीकरणे, पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि धक्कातंत्र यामुळे या निवडणुका अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


* असा असेल निवडणूक कार्यक्रम :-

अधिसूचना जारी - 25 मे 2026

- नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - 1 जून 2026

- अर्ज छाननी - 2 जून 2026

- अर्ज माघारीची अंतिम तारीख - 4 जून 2026

- मतदान - 18 जून 2026

- मतदानाची वेळ - सकाळी 8 ते दुपारी 4

- मतमोजणी - 22 जून 2026

- निवडणूक प्रक्रिया पूर्ण - 25 जून 2026


या निवडणुकीचा थेट परिणाम विधान परिषदेतील संख्याबळावर होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. अनेक ठिकाणी स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता असून नाराज नेते, अपक्ष गट आणि स्थानिक आघाड्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केल्याची चर्चा रंगू लागली असून, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेकडून अखेर कोणाला संधी मिळणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement