* श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोराडी / मिलिंद गाडेकर :- नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत मोटर ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले. समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाला गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना मोटर ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
महाआरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणीसह दिव्यांग बांधवांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मोटर ट्रायसिकल मिळाल्याने अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळाला. समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देणे हीच खरी सेवा आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी आमदार टेकचंद सावरकर, महादुला नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा हेमलताताई सावजी, उपाध्यक्ष वैशालीताई पखिद्दे, मौदा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजप मौदा तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे, नेहताई राऊत, सवीताताई जिजकार, नरेंद्र धानोले, राधाताई अग्रवाल, लुकेश वरोकर, चांगोजी तिजारे, प्रीतम लोहासारवा, डॉं. सौरभ अग्रवाल, कुणाल कडू, रवी चव्हाण, अभिजित ढेंगरे, नंदाताई तुरक, गोपालसिंग नैकाने, गंगाताई जैन, संध्याताई साबळे, सचिन पाटील, मोहसीन शेख, मनोज सावजी, अनुराधाताई अमीन, कुणाल भोस्कर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोटर ट्रायसिकल मिळाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी संस्थेचे आणि आयोजकांचे आभार मानले. या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्रपणे प्रवास करणे आणि दैनंदिन कामे करणे अधिक सोपे होणार असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली. समाजहिताच्या अशा उपक्रमांमुळे गरजू घटकांना मोठा आधार मिळत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.


Social Plugin